राज्यात निर्माण झालेली परिस्थिती आणि देशातील महाराष्ट्राच्या स्थानाबद्दल शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी संवाद साधला. यावेळी महाराष्ट्रातील आणि देशातील प्रश्नांबद्दल बोलताना त्यांनी नव्या पिढीबद्दलची एक खंतही बोलून दाखवली. “नव्या पिढीला आपण पंगू आणि षंढ करून ठेवलं आहे,” असं ते बोलताना म्हणाले. तसेच त्याची कारणही उलगडून दाखवली.

शिवसेना नेते संजय राऊत यांनी एका मुलाखतीत राज्यातील विविध प्रश्नांवर भाष्य केलं. त्याचबरोबर राजकीय, सामाजिक भूमिकांविषयी त्यांनी मांडणी केली. महाराष्ट्राच्या लढाऊ बाणा आणि सध्याच्या जनतेची भूमिका यासंदर्भात राऊत यांना प्रश्न विचारण्यात आला होता.

या प्रश्नावर बोलताना संजय राऊत म्हणाले,”महाराष्ट्रात जो लढा झाला व ज्यांनी तो लढला त्यांना काही मिळवायचं नव्हतं. काही टिकवायचं नव्हतं. त्यांना पुढल्या पिढ्यांसाठी काही घेऊन जायचं नव्हतं म्हणून तो लढा होऊ शकला. म्हणून त्या लोकांच आयुष्य त्याग होमात भस्म झालं. आता स्वतःच भस्म करून घ्यायला कुणी तयार नाही. मला वाटतं या पिढीला ती तळमळ दिसत नाही. ही आपली शेवटची पिढी आहे, जी आतल्या आत तडफडत आहे. जी नवी पिढी आहे, आपण त्यांना पंगू आणि षंढ करून ठेवलं आहे. फार लढू नका. काही संघर्ष करू नका. तडजोडी करून आपण यापुढे जगत राहु. महाराष्ट्राविषयी ज्या भावना आपल्या पिढीनं पाहिल्या, त्या भावना मला आता कुणामध्ये दिसत नाही. ही पिढी हळूहळू नष्ट होत जाईल. याचं कारण आपल्यामध्ये बाळासाहेब ठाकरे नाहीत. आचार्य अत्रे नाहीत. आज आपल्यामध्ये कॉ. श्रीपाद अमृत डांगे नाहीत. बरेच लोकं नाहीत. आपल्यामध्ये वसंतदादा पाटील नाहीत. ज्यांनी मुंबई महाराष्ट्रापासून तोडाल, तर याद राखा. हे त्यांनी स्वतः मुख्यमंत्री असताना तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी यांना सांगितलं होतं. हे असं परखडपणे, सत्ताधाऱ्यांची परवा न करता. बोटचेपणाची भूमिका न करता, अशी भूमिका घेणारे लोक आज आपल्यात नाहीत. त्यामुळे कोणतं बाळकडू आपण या पिढीला पाजणार आहोत,” अशी खंत राऊत यांनी व्यक्त केली.