भाजपाच्या दबावामुळे सध्या शहरातील शिवसैनिकांवर खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत, असा आरोप शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. त्यांनी यासंदर्भात शनिवारी औरंगाबादच्या पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली. खोटी प्रकरणे उभी करून पोलीस शिवसैनिकांना त्रास देत आहेत. त्यांना तडीपार आणि गुन्हे दाखल करण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत, असे खैरेंनी म्हटले. या पार्श्वभूमीवर चंद्रकांत खैरे यांनी एका शिष्टमंडळासह पोलीस आयुक्तांची भेट घेतली. त्यावेळी पोलीस आयुक्तांनी स्पष्टीकरण देताना म्हटले की, शहरात १५० जणांवर तडीपारीचे गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी फक्त तीन शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत. हे तिघेही गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत. आमच्यावर एकाही प्रकरणात दबाव आलेला नाही. तरीही आपल्याला चुकीच्या पद्धतीनं कारवाई केली असं वाटत असेल तर विभागीय आयुक्तांकडे आपण तक्रार करू शकता. मात्र, मला शिवसेना प्रिय आहे. शिवसैनिकांवर चुकीच्या पद्धतीने कारवाई केली जाणार नाही, असे आश्वासन आयुक्तांनी शिवसेनेच्या शिष्टमंडळाला दिले.

शिवसैनिकांवर राजकीय द्वेषातून काही असंतुष्ट व्यक्ती पोलिसांकडे खोट्या तक्रारी देत असल्याचे शिवसेनेच्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. पोलीस अशा खोट्या तक्रारींची चौकशी न करताच गुन्हे दाखल करीत आहेत. शिवसैनिक प्रत्येक वसाहतीमध्ये पोलीस प्रशासनाला नेहमीच सहकार्य करीत असतो. त्यामुळे त्या-त्या भागात शांतता-सुव्यवस्था राहण्यास मदतच होत असते. परंतु, कुणाच्या तरी दबावाला बळी पडून पोलीस प्रशासन शिवसैनिकांचे खच्चीकरण करत आहेत. पोलिसांकडून होणारा अन्याय गंभीर आहे. यापूर्वी प्रत्यक्ष भेटून शिवसैनिकांना न्याय मिळावा म्हणून विनंती केलेली होती. मात्र, त्याचा आपल्या पोलिस प्रशासनावर काहीच परिणाम झालेला दिसत नाही. अशीच परिस्थिती राहिल्यास पोलीस प्रशासनाविरुध्द शिवसैनिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण होईल. त्यामुळे आपण शिवसैनिकावरील खोटे गुन्हे, तक्रारी याची शहानिशा करुन पोलिसांकडून होणारा अन्याय त्वरीत थांबवावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. आठ दिवसांत हा प्रकार थांबला नाही तर आम्हाला नाईलाजाने पोलीस प्रशासनाविरुध्द शिवसेना स्टाईलने आंदोलन उभे करावे लागेल, असा इशाराही शिवसेनेच्या शिष्टमंडळाने दिला आहे.