शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत हे बेळगावमध्ये पोहोचले आहेत. प्रगट मुलाखतीच्या कार्यक्रमासाठी संजय राऊत बेळगावमध्ये आले आहेत. विमानतळावर त्यांना बेळगाव पोलिसांनी रोखलं होतं. विमानतळावरील केबिनमध्ये पोलिसांबरोबर चर्चा करुन राऊत बाहेर पडले.

कालपर्यंत पोलिसांनी संजय राऊत यांच्या बेळगाव दौऱ्यातील कार्यक्रमांना परवानगी दिली नव्हती. पण आज सकाळी काही नियम व अटींसह त्यांच्या कार्यक्रमांना परवानगी देण्यात आली आहे. कर्नाटक नवनिर्माण सेनेचा प्रमुख भीमा शंकर पाटील यांनी राऊत यांच्या बेळगाव दौऱ्याला विरोध केला आहे. महाराष्ट्रातील नेत्यांना बेळगावमध्ये येण्याची परवानगी देऊ नये अशी कनसेची मागणी आहे.

भीमा शंकर पाटीलच्या इशाऱ्यामुळे सीमा भागात तणावाचे वातावरण आहे. विमानतळ परिसरात मोठया प्रमाणावर पोलिसांचा बंदोबस्त आहे. महाराष्ट्र एकीकरण समिती आणि शिवसैनिकांनी संजय राऊत यांचे बेळगावमध्ये स्वागत केले. संजय राऊत विमानतळाबाहेर आल्यानंतर ‘बेळगाव आमच्या हक्काचे’ अशी घोषणाबाजी करण्यात आली.