शिवसेना खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्रात लवकरच परिस्थिती नियंत्रणात येईल असा विश्वास व्यक्त केला असून राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं कौतुक केलं आहे. दिल्लीलाही ‘महाराष्ट्र मॉडेल’प्रमाणेच चालावे लागेल सांगताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री काम करत आहेत त्या पद्दतीने देशाला काम करावं लागेल असं ते म्हणाले आहेत. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

“मुंबईत रुग्णसंख्या कमी होऊ लागली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे २४ तास काम करत आहेत. प्रत्येक गावात, घरात काय सुरु आहे त्याची माहिती घेत आहेत. महाराष्ट्रात लवकरच परिस्थितीवर नियंत्रण आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. राज्य सरकार आणि प्रशासनातील प्रत्येक व्यक्ती ताकद लावून काम करत आहे,” असं संजय राऊत यांनी सांगितलं.

“देशातील स्थिती गंभीर आहे, काही राज्यांनी सुरुवातीपासून चाचण्या केल्या नाहीत . अचानक लाटा उसल्यामुळे उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल येथून आकडेवारी यायला लागली आहे. पण मुंबईसारख्या मोठ्या शहारत संख्या निम्य्यावर आली आहे. कारण महाराष्ट्रात प्रशासन, राज्य सरकार, स्वत: मुख्यमंत्री सूत्र आपल्या हातात घेऊन गाव पातळीवरही यंत्रणा राबवली जात आहे की नाही हे पाहत आहेत,” असं संजय राऊत म्हणाले आहेत.

विरोधकांच्या टीकेला उत्तर
“मुख्यमंत्र्यांनी राज्यातील सूत्रं हातात ठेवून सतत काम करत आहेत. कोणत्याही युद्धात सेनापती हा प्रत्यक्ष युद्धभूमीवर जाऊन लढत नाही. ते वॉररुममध्ये बसून यंत्रणा राबवत असतात आणि विजयाकडे नेतात. महाराष्ट्रात रुग्णसंख्या कमी होण्याचं श्रेय मुख्यमंत्र्यांना दिलंच पाहिजे. विरोधकांनी काही काळ टीका करणे बंद करावे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नुकतंच मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्र मी वाचलं. या पत्रातील अनेक सूचना उत्तम आहेत. राज्य सरकार त्याचा नक्कीच गांभीर्याने विचार करेल,” असं संजय राऊत यांनी सांगितलं.

लॉकडाउनवर भाष्य
लॉकडाउन वाढण्याचे संकेत असल्याच्या प्रश्नावर बोलातना ते म्हणाले की, “मुंबईसारख्या ठिकाणी लॉकडाउनचा परिणाम दिसू लागला आहे. रुग्णसंख्या निम्म्यावर आली आहे. जर रुग्णसंख्या कमी होत असेल तर काही कठोर निर्बंध सरकारने घेतले तर सरकारला पाठिंबा दिला पाहिजे”.

करोनामुळे देश 20 वर्षे मागे
“गेल्या पाच-दहा वर्षात देश किती पुढे गेला माहिती नाही. पण करोना संकटामुळे देश २० वर्षे मागे गेला आहे. देशातील अनेक व्यवस्था कोलमडून पडल्या असून आता अनेकांना जगण्यासाठी संघर्ष करावा लागेल,” असं संजय राऊत यांनी सांगितलं.

“आपण करोनाच्या पहिल्या लाटेशी चांगला मुकाबला केला, दुसऱ्या लाटेत थोडी गडबड झाली असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं आहे. आता परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न सुरु असून आपण सर्वांनी सकारात्मकपणे विचार केला पाहिजे. आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली बदनामी होत असल्याचं मान्य आहे. पण हा कलंक दूर कारावा लागेल,” असं आवाहन संजय राऊत यांनी केलं.

उत्तर प्रदेशला मदत केली पाहिजे
“प्रियंका गांधी या राज्याच्या काँग्रेस प्रभारी आहेत. उत्तर प्रदेश खूप मोठं राज्य आहे. त्या राज्याची लोकसंख्या खूप मोठी आहे. संपूर्ण राज्याची परिस्थिती चिंताजनक आहे. यात राजकारण न करता सर्व पक्षांनी एकत्र येऊन उत्तर प्रदेशला काय मदत करता येईल हे पहायला पाहिजे,” असं आवाहन संजय राऊत यांनी यावेळी केलं.