राज्यात युतीचे ४१ खासदार आहेत, त्यामुळे पुढचा मुख्यमंत्री भाजपाचाच असेल असे वक्तव्य राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले होते. भाजपाने हा दावा केल्यानंतर शिवसेनेतून नाराजीचा सूर उमटत असल्याचे दिसत आहे. दरम्यान, युतीच्या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जे जाहीर केले त्यात कोणताही बदल होणार नाही, अशी माहिती शिवसेनेच्या सूत्रांकडून देण्यात आली.

लोकसभा निवडणुकांपूर्वी शिवसेना भाजपा युतीचा निर्णय घेण्यात आला होता. तसेच पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यांनी युतीबाबत माहिती दिली होती. शिवसेना भाजपा युतीला लोकसभा निवडणुकीत राज्यात मोठे यश मिळाले होते. त्यानंतर सोमवारी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पुढील मुख्यमंत्री भाजपाचाच असेल असा दावा केला होता. तसेच राज्यात युतीचे ४१ खासदार आहेत, त्यामुळे पुढचा मुख्यमंत्री भाजपाचाच असेल असे वक्तव्य राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घेतलेल्या बैठकीतही भाजपाचाच मुख्यमंत्री होण्यासाठी पूर्ण ताकदीने कामाला लागा असेच आदेश देण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री भाजपाचाच हा नारा दिल्याने शिवसेना नाराज झाली आहे का? हे विचारले असता शिवसेनेचा कोणताही नाराजीचा सूर नाही. मिले सूर मेरा तुम्हारा, ये दोस्ती हम नहीं तोडेंगे असे म्हणत आम्ही काम करू आणि करत आहोत, असे म्हटले होते.

असे असले तरी शिवसेनेच्या गोटातून नाराजीचा सूर बाहेर येऊ लागला आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी युतीची घोषणा करताना स्वत: जे जाहीर केले आहे त्यात तसूभरही फरक पडणार नाही. त्यामुळे पुढचा मुख्यमंत्री भाजपाचाच असेल अशा बातम्यांना कोणी महत्त्व देऊ नये, असे सूत्रांकडून सांगण्यात आले. यापूर्वी महसूलमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनीदेखील युतीचा फॉर्म्युला सांगितल्यानंतर शिवसेनेकडून नाराजी व्यक्त करण्यात आली होती. राज्यात शिवसेनाच मोठा भाऊ आहे, असे वक्तव्य अनेकदा शिवसेनेकडून करण्यात आले होते. तसेच मुख्यमंत्रीपदावर शिवसेनेचा दावा करत होती. परंतु युतीच्या घोषणेदरम्यान याबाबत काही जाहीर करण्यात आले नव्हते. परंतु सत्तेत पदे आणि जबाबदारीचे समान वाटप केले जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट होते. परंतु आता मुनगंटीवार यांच्या वक्तव्यानंतर शिवसेना काय भूमिका घेईल हे पहावे लागणार आहे.