आमचं हिंदुत्व प्रमाणित करण्यासाठी, स्प्ष्ट करण्यासाठी इतर कोणत्या पक्षाची गरज नाही. आम्ही प्रखर हिंदुत्ववादी होतो, आहोत आणि राहू असं सांगत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज आठवा स्मृतीदिन असून शिवाजी पार्क येथील स्मृतीस्थळावर अभिवादन करण्यासाठी सकाळपासून शिवसेना कार्यकर्ते आणि नेते गर्दी करत आहेत. संजय राऊतदेखील स्मृतीस्थळावर पोहोचले होते. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

हिंदुत्वावरुन भाजपा शिवसेनेवर करत असलेल्या टीकेसंबंधी विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “आमचं हिंदुत्व प्रमाणित करण्यासाठी, स्प्ष्ट करण्यासाठी इतर कोणत्या पक्षाची गरज नाही. आम्ही प्रखर हिंदुत्ववादी होतो, आहोत आणि राहू, आम्हाला तुमच्याकडून प्रमाणपत्राची गरज नाही. आम्ही कधीच हिंदुत्वाचं राजकारण करत नाही. देशात जिथे कुठे गरज पडेल तेव्हा शिवसेना हिंदुत्वाची तलवार घेऊन हजर राहील”.

आणखी वाचा- बाळासाहेबांच्या हयातीत त्यांना सोडलेल्यांनी स्मारकावर बोलू नये; शिवसेनेचा मनसेला टोला

“गेल्या वर्षी याच काळात सरकार बनवण्याची प्रक्रिया सुरु होती. लोकांच्या मनात शंका होत्या. पण आज बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळार शिवसेनेचा मुख्यमंत्री तेसुद्दा उद्धव ठाकरे यांच्या रुपाने मानवंदना देण्यासाठी आले आहेत. बाळासाहेब आमच्यात नाहीत ही वेदना कायम राहील. पण बाळासाहेब आमच्यासोबत आहेत आणि सतत राहतील, प्रेरणा देतील असा विश्वास आहे,” असं यावेळी त्यांनी सांगितलं.
“आजच्या दिवशी शिवसेनाप्रमुखांना आम्ही फक्त देहाने निरोप दिला पण त्यांचे विचार, हिंदुत्व, मराठी बाणा हे सगळं आमच्यासोबत कायमस्वरुपी आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वात हा वारसा पुढे नेऊ,” असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

आणखी वाचा- स्मृतिदिन विशेष : बाळसाहेबांच्या शेवटच्या भाषणापासून सिनेमाच्या जगाशी असणारे खास नाते… वाचा १६ विशेष लेख

“आजही देशाचं राजकारण ५५ वर्षांपूर्वूी बाळासाहेबांनी जो बेरोजगारी, भूमीपुत्रांचा मुद्दा मांडला त्यावरच केंद्रीत आहे. बिहार निवडणुकीत पाहिलं असेल तर या दोन मुद्द्यांवर विषय केंद्रीत राहिला. महाराष्ट्रात बाळासाहेबांनी ५५ वर्षांपूर्वी ठिणगी टाकली होती. प्रत्येक राज्यात भूमीपूत्रांचा विषय राजकारणातला आणि समाजकारणातला महत्वाचा विषय ठरतोय,” असं संजय राऊत यांनी म्हटलं.