जुहू येथील कंगनाच्या कार्यालयावर करण्यात आलेल्या कारवाई प्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांना प्रतिवादी करण्यात आलं असून बाजू मांडण्यास सांगण्यात आलं आहे. दरम्यान संजय राऊत यांनी आपण बाजू मांडणार असून कोणी महाराष्ट्राची बदनामी करणार असेल तर षंढासारखं गप्प बसणार नाही असा इशाराही दिला आहे. पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

संजय राऊत यांनी म्हटलं आहे की, “मी महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी लढणारा एका सामान्य कार्यकर्ता, शिवसैनिक आहे. आम्हाला हे बाळकडू आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते बाळासाहेब ठाकरेंपर्यंत सर्वांनी दिलं आहे. जर कोणी महाराष्ट्राची बदनामी करत असेल, आमच्या नेत्यावर चिखलफेक करत असेल तर उसळून उठलं पाहिजे. आम्ही काही षंढासारखे बसून राहणार नाही”. “उद्धव ठाकरे यांचीही तीच भूमिका आहे. मी महाराष्ट्राची भूमिका मांडली म्हणजे शिवसेनेची भूमिका मांडली. व्यक्तिगत स्वार्थासाठी महाराष्ट्राची बदनामी करु नका, केली तर आम्ही उसळून उठू,” असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.

आणखी वाचा- मुंबईत गुंडाराज! जगातील सर्वात अकार्यक्षम मुख्यमंत्र्यांना कुणीही प्रश्न विचारत नाहीये; कंगनाचा ‘ट्विट’हल्ला

“कंगना तरुण आहे, त्यांनी राग व्यक्त केला पाहिजे. तरुणांचा राग मनात दाबला तर स्फोट होतो. राग व्यक्त करणं चांगल्या मानसिकतेचं दर्शन आहे. फक्त त्यात विकृती नको,” असं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं.

आणखी वाचा- फडणवीस भेटीवर संजय राऊतांनी पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया, म्हणाले…

देवेंद्र फडणवीस भेटीवर केलं भाष्य
“देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे महत्त्वाचे नेते आहेत. राष्ट्रीय स्तरावरही त्यांचं नावलौकिक होत आहे. तरुण नेत्याला आपली मतं मांडता येतील. देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत नक्कीच घेणार आहे असं सांगताना संजय राऊत यांनी सामनातील मुलाखत घेण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली असल्याचं सांगितलं. याआधी शरद पवार यांचीही मुलाखत घेतली होती. भविष्यात राहुल गांधी, अमित शाह यांचीही मुलाखत घेणार असंही त्यांनी सांगितलं. देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत अनएडिटेड असेल असंही त्यांनी स्पष्ट केलं.

“जेव्हा दोन शास्त्रज्ञ भेटतात तेव्हा ते त्यांच्या क्षेत्रावर चर्चा करतात, डॉक्टर भेटतात तेव्हा ते वैद्यकीय क्षेत्रात काय सुरु आहे यावर चर्चा करतात. जेव्हा दोन राजकारणी भेटतात तेव्हा ते राजकीय क्षेत्रावर बोलतात. आम्ही भेटत नाही असं वाटत असेल तर त्याला काही पर्याय नाही. पण असे भूकंप वैगेरै काही होत नाहीत,” असं संजय राऊत यांनी फडणवीस भेटीवर बोलताना सांगितलं. “चंद्रकांत पाटील म्हणालेत पहाटे भूकंप होईल. आता त्यांनी गजर वैगेरे लावला असेल तर मला माहिती नाही,” असा टोलाही यावेळी त्यांनी लगावला. “पाच वर्ष काही काम नसल्याने आमच्या भेटीने भाजपा नेत्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत,” असंही ते म्हणाले.

आणखी वाचा- राज्यात मध्यावधी निवडणुका? संजय राऊत यांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…

बिहार निवडणूक शिवसेना लढणार का?
“बिहारमध्ये निवडणूक लढण्याची आमची इच्छा आहे. याबाबत लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार आहे. निवडणूक लढण्यासाठी जिंकायची असते पण कधी कधी कार्यकर्त्यांचं मनोबल कायम राहावं यासाठीही लढावी लागते,” असं संजय राऊत यांनी सांगितलं.

गुप्तेश्वर पांडेंच्या राजकीय प्रवेशावर भाष्य
“गुप्तेश्वर पांडे राजीनामा देऊन राजकीय पक्षात गेले यावर कधीच टीका करणार नाही. देशभरात असे अनेक प्रयोग झाले आहेत. सत्यपाल सिंह यांनी राजीनामा दिला आणि भाजपात गेले. असे अनेक अधिकारी मी दिल्लीत, विधानसभेत पाहतो. गुप्तेश्वर पांडे यांनी सुशांत प्रकऱणात ज्या पद्धतीने महाराष्ट्र पोलिसांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला फक्त यावर आमचा आक्षेप आहे. निवडणूक लढण्याचा त्यांना अधिकार आहे. पण तुम्ही महाराष्ट्राची बदनामी करुन, महाराष्ट्र विरुद्ध बिहार असा संघर्ष करुन त्याचा लाभ घेण्यासाठी असं करत होतात त्याला विरोध आहे,” असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं.

“ज्यांनी ज्यांनी सुशांत प्रकरणात दात उचकटले होते त्यांचे दात लवकरच घशात जातील याची मला खात्री आहे. याच्यात शिवसेनेच्या केसेलाही धक्का लागला नाही. किती चिखल फेकला तरी काही झालं नाही. आता आम्ही सीबीआयच्या अहवालाची वाट पाहत आहोत,” असं सांगत संजय राऊत यांनी भाजपा नेत्यांवर टीका केली.