राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी करोनाच्या दुसऱ्या लाटेच्या इशाऱ्याकडे नागरिकांबरोबरच सरकारनेही दुर्लक्ष केल्याचं म्हटलं आहे. ही दोषारोप करण्याची वेळ नसल्याचंही ते म्हणाले आहेत. विज्ञान व सत्याच्या आधारावरच करोनाशी लढा दिला पाहिजे, या उद्योगपती अझिम प्रेमजी यांच्या स्पष्टोक्तीचे त्यांनी समर्थन केलं. मोहन भागवत यांच्या वक्तव्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

संजय राऊत यांना मोहन भागवतांच्या वक्तव्यासंबंधी विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “पहिल्या लाटेनंतर आपण गाफील राहिलो हे सर्वांचे म्हणणे आहे”. सोनाराने कान टोचले हे बरे झाले असं सांगत यावेळी त्यांनी मोदी सरकारला टोलादेखील लगावला.

नवी दिल्ली येथील ‘कोविड रिस्पॉन्स टीम’द्वारे आयोजित ‘आपण जिंकणारच – पॉझिटिव्हिटी अनलिमिटेड’ विषयावर आयोजित व्याख्यानमालेत भागवत यांनी करोना सद्य:स्थिती आणि या संकटाचा मुकाबला कसा करता येईल, याविषयी विस्तृत विवेचन केलं. भागवत म्हणाले, ‘‘डॉक्टरांनी पहिल्या लाटेनंतर इशारा देऊनही सर्वांनी पुरेशी दक्षता बाळगली नाही. त्यामुळे आजची परिस्थिती निर्माण झाली आहे. आता तिसऱ्या लाटेची चर्चा सुरू आहे. रोजगार, शिक्षण आणि अर्थव्यवस्थेवरही परिणाम होण्याची शक्यता आहे; पण घाबरण्याचे कारण नाही. वज्राप्रमाणे खंबीर राहून सकारात्मकतेने या संकटाचा मुकाबला केला पाहिजे. एकमेकांवर दोषारोप करण्याचा किंवा बोटे दाखविण्याचा हा काळ नाही’’.

दुसऱ्या जागतिक महायुद्धानंतर ब्रिटनमध्ये वाईट परिस्थिती होती; पण पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांच्या कार्यालयात एक प्रबोधन वाक्य लिहिलं होतं- ‘निराशावादी विचारांना आणि पराभवाच्या शक्यतांना येथे थारा नाही’ असा आशय त्यातून व्यक्त होत होता, असे भागवत यांनी नमूद केलं.

तिसऱ्या लाटेसाठी खडकाप्रमाणे सज्ज राहा
देशाने करोना साथीच्या तिसऱ्या लाटेसाठी तयार राहण्याचे आवाहन भागवत यांनी केलं. आपण घाबरत आहोत का? तिसरी लाट आलीच तर लाटा आदळणाऱ्या एखाद्या खडकासारखे आपण सज्ज असले पाहिजे, असं भागवत म्हणाले. “आपण या कठीण काळात धैर्य न गमावता परिस्थितीवर मात करू आणि जिंकूच, हा दृढविश्वास ठेवून संघटितपणे करोनाचा मुकाबला केला पाहिजे,” असंही त्यांनी सांगितलं.