दिल्लीत लोहपुरुषाची गरज होती, पण याच लोहपुरुषाने देशातील १२५ कोटी जनतेला भिकारी बनवून रस्त्यावर आणले अशी घणाघाती टीका शिवसेनेने केली आहे. पाचशे आणि हजारच्या नोटा रद्द करुन जनतेला भूककंगाल करणे हे जालियनवाला बागपेक्षाही भयंकर असल्याचे शिवसेनेने म्हटले आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त सामनाच्या अग्रलेखातून बाळासाहेबांना मानवंदना देण्यात आली आहे. अग्रलेखात बाळासाहेबांच्या विचारांचे दाखले देत शिवसेनेने मोदी सरकारला खडेबोल सुनावले आहेत. निवडणुका नसतानाही जनता बोटांना शाई लावू रांगेत उभी असून हा एक अपराधच आहे. शाई लावलेले बोट खिशात घालून लोक निराश मनाने रांगेत उभे आहे. हे नैराश्य म्हणजे देशभक्ती असल्याचा दावा केला जातो. पण हा देशभक्तांचा अपमान असल्याची टीका शिवसेनेने केली आहे. देशातील जनतेला आता बाळासाहेबांची आठवण येत असून हा देशातील सर्वच राजकीय पुढा-यांचा पराभव असल्याचे अग्रलेखात नमूद करण्यात आले. केंद्र सरकारच्या मोहम्मदी कारभारामुळे जनता कंटाळली असल्याचा दावाही शिवसेनेने केला आहे. ५००-१००० च्या नोटा रद्द करून जनतेला भुकेकंगाल करणे हे जालियनवाला बागेपेक्षाही भयंकर असून या परिस्थितीला टक्कर देणारे नेतृत्व सध्या नाही अशी खंतही सेनेने व्यक्त केली आहे. जनतेच्या जीवनाचा सांगाडा झाला आहे, कारखाने बंद झाले, लोकांच्या विझलेल्या मनावरील राखेवर फुंकर मारुन निखारे धगधगत ठेवण्यासाठी बाळासाहेब ठाकरे आज हवे होते असे अग्रलेखात म्हटले आहे.

देशाला लोहपुरुषाची गरज असल्याचे असे बाळासाहेब ठाकरे म्हणायचे. पण दिल्लीतील लोहपुरुषाने जनतेला रस्त्यावर आणले. पाकव्याप्त काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राईक झाले. पण त्यातून पाकला अद्दल घडली का असा सवालही शिवसेनेने उपस्थित केला आहे.