महाराष्ट्राचे अराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांबाबत अपशब्द वापरणाऱ्या श्रीपाद छिंदमना अटक करण्यात आली आहे. अहमदनगरचे उपमहापौर असलेल्या छिंदम यांनी शिवाजी महाराजांबाबत कसे अपशब्द काढले याची एक ऑडिओ क्लिप शुक्रवारी व्हायरल झाली. ज्यानंतर भाजपाने त्यांचा राजीनामा घेत पक्षातून हकालपट्टीही केली. त्यानंतर छिंदमना अटक करण्यात आली आहे. श्रीपाद छिंदम कारने पळून जात होते त्यावेळी सोलापूर रोड भागात असलेल्या शिवाराचाही आधार त्यांनी लपण्यासाठी घेतला. मात्र नागरिकांनी त्यांचा पाठलाग केला आणि पोलिसांना बोलावले. ज्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने छिंदमना अटक केली.

सोमवारी शिवजयंती असल्याने राज्यात उत्साहाचे वातावरण आहे अशात अहमदगरमध्येही शिवजयंतीची तयारी सुरु होती. मात्र महापालिकेतील बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यासोबत फोनवर बोलताना छिंदम यांनी शिवाजी महाराज आणि शिवजयंती याबाबत अत्यंत हीन दर्जाचे शब्द वापरले. ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर अहमदनगरमध्ये तणाव निर्माण झाला तसेच औरंगाबादमध्येही या प्रकरणाचे पडसाद उमटले.

शिवसेनेचे शहरप्रमुख व नगरसेवक यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार तोफखाना पोलिसांनी छिंदम यांच्याविरुद्ध अश्लील व अपशब्द वापरून धार्मिक भावना दुखावल्याचा गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होण्यापूर्वीच संतप्त व तणावाचे वातावरण निर्माण झाल्याचे पाहून छिंदम फरार झाले. मात्र लोकांनी त्यांचा पाठलाग केला आणि त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. ‘एबीपी माझा’ने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड करत छिंदमविरोधात मोर्चा काढला तसेच खासदार दिलीप गांधी यांच्या कार्यालयावरही दगडफेक करण्यात आली. तणाव निर्माण झाल्याने श्रीपाद छिंदम यांनी एका व्हिडिओद्वारे आपला माफीनामाही सादर केला. मात्र त्यांना आता पोलिसांनी अटक केली आहे.