राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतील गुणवंत छात्रांमध्ये पुन्हा एकदा महाराष्ट्राचा झेंडा फडकला आहे. एनडीएच्या १२५ व्या तुकडीच्या पदवीप्रदान समारंभात गुरुवारी साताऱ्याचा छात्र सूरज इथापे याने सामाजिक शास्त्रांत प्रथम क्रमांक पटकावून वायुदलप्रमुख चषकाचा मान मिळवला. उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्याला कमांडंट रौप्य पदकही प्रदान करण्यात आले. असे असले तरी प्रबोधिनीत मराठी मुलांची संख्या अत्यल्प असून अजूनही एनडीएत महाराष्ट्र नसल्याचेच मत सूरज याने व्यक्त केले.
सूरज वाईमधील चिंधवली गावातील शेतकरी कुटुंबातला आहे. त्याचे वडील संजय इथापे सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेत विभागीय विकास अधिकारी म्हणून काम करतात. त्याची आई उज्ज्वला इथापे गृहिणी असून मोठी बहीण माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम करते. सूरजचे आजोबा माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे स्वीय सहायक म्हणून काम पाहात असत. नातवाने एनडीएत जावे ही त्यांची इच्छा सूरजने पूर्ण केल्याचे त्याच्या वडिलांनी सांगितले. या पदवीप्रदान समारंभात हरियाणाच्या रोहतक गावातून आलेला छात्र सोनू बराक या छात्राने तीनही विद्याशाखांमधून प्रथम क्रमांक पटकावला. त्याला ‘कमांडंट रौप्य पदक’ आणि शास्त्र शाखेत प्रथम आल्याबद्दल ‘लष्करप्रमुख चषक’ आणि तिन्ही शाखांमधून प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल ‘नौदलप्रमुख चषका’चा मान मिळाला.