सोलापुरात दररोज करोनाबाधित रूग्णांची संख्या वाढतच असून आज रविवारी एकाच दिवशी करोनाबाधित ८४ नव्या रूग्णांची भर पडली आणि पाच वृध्द करोनाचे बळी ठरले. गेल्या ४९ दिवसांत एकूण रूग्णसंख्या ९४९ तर मृतांची संख्या ८८ वर पोहोचली आहे.

आज रात्री प्राप्त झालेल्या माहितीनुसार करोनाशी संबंधित २७५ चाचणी अहवाल हाती आले. त्यातील विविध ३९ ठिकाणच्या ८४ रूग्णांना करोनाची बाधा झाली. यात ४० पुरूष व ४४ महिला आहेत. ग्रामीण भागातील बार्शीत सहा तर अक्कलकोटमध्ये चार रूग्ण सापडले. शहरातील मुळेगाव-राघवेंद्रनगरात सात रूग्ण आढळून आले. तसेच साखर पेठ-६, सलगर वस्ती व विडी घरकूल-प्रत्येकी ५, सात रस्ता बिग बाजार, साईबाबा चौक, बुधवार पेठ-प्रत्येकी ४ याप्रमाणे आढळून आलेल्या नव्या रूग्णांचा समावेश आहे. अद्याप ५८१ अहवाल प्रलंबित आहेत.  आज पाच वृध्द रूग्णांचा मृत्यू झाला असून यात दोन महिलांचा समावेश आहे. आतापर्यंतचे बहुसंख्य रूग्ण आणि मृतांचा परिसर प्रामुख्याने दाटीवाटीच्या झोपडपट्ट्यांमधील आहेत.