सोलापूर

करोना विषाणूचा प्रचंड वेगाने होणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सोलापूर शहर व आसपासच्या पाच तालुक्यांतील ३१ गावांमध्ये दहा दिवसांच्या संपूर्ण संचारबंदीला शुक्रवारी प्रारंभ झाला. संचारबंदीचा प्रभावी अंमल होण्यासाठी पहाटेपासूनच पोलिसांनी रस्त्यावर गस्त वाढविली असताना दुसरीकडे जनतेचा सकारात्मक प्रतिसाद मिळू लागल्याचे सार्वत्रिक चित्र दिसून आले.

संचारबंदीच्या काळात करोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाने बाधित क्षेत्रांमध्ये वयोवृध्द आणि मधुमेह, रक्तदाब व इतर आजार असलेल्या व्यक्तींच्या जलद चाचण्या घेण्यासही प्रारंभ केला आहे. गरिबांच्या झोपडपट्ट्यांपासून ते श्रीमंतांच्या बंगल्यांपर्यंत करोनाचा शिरकाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. बाधित रूग्णसंख्या पाच हजार तर मृत्युचा आकडा चारशेच्या दिशेने वाटचाल करीत आहे. शहराच्या बरोबरीनेच आता ग्रामीण भागातही बाधित रूग्ण सापडण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे प्रशासनाने दहा दिवसांसाठी पुन्हा संपूर्ण संचारबंदी लागू करण्याचा निर्णय अंमलात आणला आहे. दूध व स्वयंपाक गॕस घरपोच पुरवठा आणि औषध दुकाने वगळता संपूर्ण संचारबंदी लादण्यात आली आहे. दूध वगळता रेशन धान्य दुकाने व भाजीपाल्यासह इतर कोणतीही जीवनाश्यक वस्तू खरेदी करता येणार नाहीत. त्यामुळे नागरिकांनीही संचारबंदीपूर्वी दोन-तीन दिवस अगोदरपासून जीवनाश्यक वस्तुंची खरेदी केली आहे. काल गुरूवारी सायंकाळी उशिरापर्यंत बाजारपेठांमध्ये खरेदीची धांदल सुरू होती. मध्यरात्रीनंतर संचारबंदी लागू होताच पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला.

संचारबंदी काळात दूधविक्रीची दुकाने बंद राहणार आहेत. त्याऐवजी दूधपुरवठा घरपोच करण्यासाठी दूध विक्रेत्यांना पोलिसांकडून पासेस वितरीत करण्यात आले आहेत. पासधारकांशिवाय अन्य दूधविक्रेत्यांना समज देऊन परत पाठविले जात होते. संचारबंदीमुळे उद्योग व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाले असून त्याचा फटका श्रमिक कामगारांना बसला आहे. यंत्रमाग व विडी उद्योगातील मिळून सुमारे एक लाख २० हजार कामगारांना रोजगाराअभावी घरीच बसावे लागणार असल्यामुळे त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न समोर आला आहे.

गरीब, श्रमिकांच्या दाटीवाटीच्या निवास परिसरात संचारबंदीचा अंमल कडक राहण्यासाठी पोलिसांनी जादा बंदोबस्त तैनात केला आहे. त्यामुळे तेथील दैनंदिन व्यवहार ठप्प होऊन सर्वत्र शुकशुकाट दिसून आला. शहरातील नवीपेठ, बाळीवेस, चाटी गल्ली, अशोक चौक, साखर पेठ, डॉ. आंबेडकर पार्क चौक, छत्रपती शिवाजी पांजरापोळ चौक आदी सर्व सतत वर्दळ असलेल्या भागातील रस्ते मोकळा श्वास घेत होते. जीवनाश्यक सेवेशी निगडीत शासकीय-निमशासकीय कर्मचारी, रूग्णालयांचे कर्मचारी व अन्य घटकांशी संबंधित पासधारक व्यक्तीची तुरळक स्वरूपात ये-जा दिसून आली. पोलिसांकडून प्रत्येकाची चौकशी होत होती. मात्र रस्त्यावर विनाकारण फिरणा-या बेजबाबदार व्यक्तींना ताब्यात घेऊन कायदेशीर कारवाई केली जात होती.

शहराप्रमाणेच अक्कलकोट व बार्शी शहरातही संचारबंदीची कडक अंमलबजावणी सुरू झाली असून मोहोळ शहरातील सार्वजनिक जनजीवन संचारबंदीमुळे ठप्प झाले आहे. उत्तर सोलापूर व दक्षिण सोलापूरसह पाच तालुक्यातील ३१ बाधित गावांमध्ये संचारबंदी लागू झाली होत असताना त्यात स्थानिक जनतेकडून तेवढाच सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचे दृश्य दिसून आले. दरम्यान, संचारबंदी काळात करोनाची साखळी तोडण्यासाठी संशयित रूग्णांसह वृध्द व मधुमेह, रक्तदाबासारख्या जुन्या आजारांशी संबंधित व्यक्तींच्या जलद चाचण्या घेण्यासही सुरूवात झाली आहे. शहरात चार हजार तर ग्रामीण भागात पाच हजार चाचण्या घेण्यात येणार आहेत. तर दुसरीकडे घरोघरी सर्वेक्षणाचे कामही चालूच राहणार आहे.