करोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर गेले ७३ दिवस बंद असलेल्या, सोलापूर कृषिउत्पन्न बाजार समितीच्या आवारात आठवड्यातून सोमवारनंतर गुरूवारी कांदा लिलाव झाला. परंतु ३१ हजार क्विंटल आयात झालेल्या कांद्याला प्रतिक्विंटल सरासरी केवळ ४०० रूपये एवढाच दर मिळाला. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे वांदे कायम असल्याचे दिसून आले.

गेल्या सोमवारी पहिल्या दिवशी १६ हजार २९८ क्विंटल कांद्याची आवक झाली. यात कांद्याला सर्वसाधारण दर पाचशे रूपये मिळाला होता. त्यानंतर आज गुरूवारी झालेल्या लिलावासाठी ३१ हजार ७० क्विंटल इतका कांदा दाखल झाला असता, किमान दर शंभर रूपये तर उच्चांकी दर ११०० रूपये मिळू शकला. सर्वसाधारण दर फक्त चारशे रूपये इतकाच मिळाला.