कौडगाव एमआयडीसीत दीड हजार एकर जमीन पडून; आता २२ ऑगस्टचा वायदा

आघाडी सरकारच्या काळात उद्योग राज्यमंत्री असताना आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी अनेक घोषणा केल्या. कधी लाकडी खेळणीचा कारखाना आणू असे सांगितले. कधी सौरपार्क करू असे आश्वासन दिले. विविध घोषणांच्या बळावर कौडगावमध्ये दीड हजार एकर जमीन सरकारने शेतकऱ्यांकडून खरेदी केली. पण ना उद्योग आला, ना जमीन वापरात आली. सौरपार्कची घोषणा तर हवेत विरली. भाजपच्या नेत्यांना तर हा प्रश्नच अद्याप न कळाल्यासारखे वातावरण आहे.

आर्थिक सव्‍‌र्हेक्षणानुसार जिल्ह्य़ाचे दरडोई उत्पन्न केवळ ५६ हजार ५५३ रुपये. हंगामी चालणारे काही साखर कारखानेवगळता हाताना रोजगार देऊ शकेल, असा एकही उद्योग नाही. अशा परिस्थितीत औद्योगिकीकरणाला चालना देण्यासाठी मोठा गवगवा करीत सोलापूर आणि उस्मानाबाद जिल्ह्य़ाच्या हद्दीवर कौडगाव औद्योगिक वसाहतीचा निर्णय जाहीर करण्यात आला. त्यासाठी अडीच हजार एकर औद्योगिक क्षेत्र प्रस्तावित करण्यात आले. त्यापकी दीड हजार एकर जमीन संपादित करण्यात आली आहे. मात्र, महाजेनकोने वेळोवेळी निविदा प्रक्रियेतून माघार घेतल्याने सौरपार्कचे भवितव्य अधांतरी आहे.

वर्षांतील तीनशेहून अधिक दिवस स्वच्छ सूर्यप्रकाश उपलब्ध असल्याचा निष्कर्ष वैज्ञानिक संस्थेने काढला. त्यामुळे सौरऊर्जेवर आधारित वीजनिर्मिती प्रकल्प आणि त्यातून रोजगार निर्मिती असे स्वप्न येथील सुशिक्षित बेरोजगारांना दाखविण्यात आले. टेक्स्टाईल पार्क, सोलार पॅनल उत्पादन, उपकरण निर्मिती आणि त्या अनुषंगाने इतर अनेक उद्योगांची नवनवीन नावे नागरिकांनी पहिल्यांदा ऐकली. विदेशातील अनेक कंपन्यांच्या प्रतिनिधींनी जिल्हा प्रशासनासमोर प्रस्तावित उद्योगाच्या अनुषंगाने सादरीकरणही केले. मात्र, सरतेशेवटी सगळेच मुसळ केरात, असे म्हणण्याची वेळ जिल्हावासीयांवर येऊन ठेपली आहे.

केंद्र सरकारने डिसेंबर २०१४ मध्ये सौरपार्क आणि अल्ट्रा मेगासोलार पॉवर प्रोजेक्ट विकसित करण्याबाबत निर्णय जाहीर केला. त्यात देशामध्ये ५०० मेगावॅटपेक्षा अधिक क्षमतेचे २५ सोलार पार्क प्रस्तावित होते. त्यातून आगामी पाच वर्षांत २ हजार मेगावॅट क्षमतेचे सौरऊर्जा प्रकल्प विकसित करण्याचे ध्येय निश्चित करण्यात आले. त्यासाठी ४ हजार ५० कोटीची भरघोस तरतूद करण्यात आली. याच कार्यक्रमांतर्गत एमआयडीसीने कौडगाव येथे अडीच हजार एकरावर ही योजना राबविण्यासाठी औद्योगिक क्षेत्र प्रस्तावित केले.

संपादित करण्यात आलेल्या जमिनीवर महाजेनकोचा ५० मेगावॅट क्षमतेचा सौरऊर्जेवर आधारित वीजनिर्मिती प्रकल्प सुरू होणार असल्याचा दावा केला जात आहे. डिसेंबर २०१६ मध्ये निविदा प्रसिद्ध झाली आणि २ जुल निविदा सादर करण्याची अंतिम तारीख होती. मात्र, मध्येच माशी आणि आता २२ ऑगस्ट ही निविदा सादर करण्याची अंतिम तारीख असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे आता २२ ऑगस्टनंतर तरी कौडगाव एमआयडीसीमागील शुक्लकाष्ठ संपणार की पुन्हा फेरनिविदा प्रक्रियेत लटकून राहणार, याकडे लक्ष लागले आहे.