शुल्लक कारणावरून झालेल्या बाचाबाचीमध्ये राग अनावर झालेल्या मुलाने डोक्यात लाकडी दांडा घालून आईचा खून केल्याची घटना तालुक्यातील वडवली, शिवाजीनगर येथे घडली. यामध्ये मयत महिलेचा शशिकला शशिकांत शिंदे (वय ५५) आणि संशयित आरोपीचे किरण शिंदे (वय ३२) असे नाव आहे. आरोपीच्या विरोधात राजापूर पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले.
याबाबत राजापूर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार शशिकला शिंदे यांचा नवरा असून ती मुलगा किरण याच्यासह घरामध्ये राहत होते. तर दुसरा मुलगा कुंदन हा मुंबई येथे नातेवाईकांकडे राहत होता. शशिकला या गावामध्ये मोलमजुरी करीत असत. तर कुंदन मुंबई येथे नोकरी करीत आहे. या दोघांच्या मिळणाऱ्या उत्पन्नातून त्यांच्या घराचा उदरनिर्वाह चालत होता तर या प्रकरणातील संशयित आरोपी कुंदन हा कोणताही कामधंदा करीत नसून त्याला दारूचे व्यसन होते. रात्रीचे जेवण झाल्यानंतर शशिकला ही शेजारच्या घरी झोपायला जात असे, सकाळ झाल्यावर ती घरी परतायची नेहमीप्रमाणे ती कालही शेजाऱ्यांकडे घरी झोपायला गेली होती. सकाळी घरी परतली असताना तिने मुलगा किरण याला घरामध्ये केरकचरा का मारला नाही याचा जाब विचारला. याचा किरणला राग येऊन त्याने नजीक असलेल्या लाकडी दांडय़ाच्या साह्य़ाने शशिकला हिला मारायला सुरुवात केली. त्यामुळे हैराण झालेल्या मयत शशिकला हिने ओरडायला सुरुवात केली. तिच्या ओरडण्याने शेजारचे त्यांच्या घराकडे धाऊन येत होते. यादरम्यान, किरणने मारलेल्या दांडय़ाचा शशिकला हिच्या डोक्यावर एका जोरदार प्रहार होऊन डोक्याची कवटी फुटून जोरदार रक्तस्राव झाला. यामध्ये तिचा जागीच मृत्यू झाला. या घडलेल्या घाबरलेल्या शेजाऱ्यांपैकी अजय सुरेश चव्हाण यांनी राजापूर पोलिसांना खबर दिली. माहिती मिळताच, पोलीस निरीक्षक विकास गावडे, साहाय्यक पोलीस निरीक्षक एस. ओटवणेकर आणि सहकारी आदी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तात्काळ संशयित आरोपी किरण याला ताब्यात घेतले. शशिकला हिचा मुंबई येथे असलेला दुसरा मुलगा कुंदन हा काही कामानिमित्ताने कुडाळ येथे आला होता. त्याला पोलिसांनी खबर देताच दुपारी तो घरी परतला. मृतदेहाचे शवविच्छदन करून मुलगा कुंदन याच्या ताब्यात देण्यात आला. याप्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक गावडे करीत आहेत.