विधानसभेच्या तोंडावर जिल्हय़ातील ११ पंचायत समित्यांचे सभापती-उपसभापती यांचा कार्यकाळ संपुष्टात येत असून नवीन सभापती, उपसभापती निवडीकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादीचे युवा नेते रमेश आडसकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे केज व धारूर या दोन पंचायत समित्यांमध्ये सत्तांतर होण्याच्या हालचाली आहेत. येथील पंचायत समित्या सध्या राष्ट्रवादीच्या ताब्यात आहेत.
जिल्हय़ातील ११ पंचायत समिती सभापती-उपसभापतींच्या निवडी रविवारी (दि. १४) होणार आहेत. सभापती, उपसभापती निवडीचे अधिकार संबंधित ठिकाणच्या नेत्यांना आहेत. केज पंचायत समितीत १४ सदस्य संख्या आहे. यात राष्ट्रवादी ९ व भाजप ५ असे बलाबल आहे. परंतु आडसकरांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने त्यांच्या गटाचे दोन सदस्य भाजपकडे जाणार, हे निश्चित आहे. त्यामुळे या दोन्ही ठिकाणी ७-७ सदस्य संख्याबळ असणार आहे. सभापतिपद ओबीसी महिलेसाठी राखीव असल्याने या ठिकाणी आडसकर गटाचे दादासाहेब ससाणे यांची पत्नी दावेदार मानली जात आहे.
धारूर पंचायत समितीत ६ सदस्य आहेत. भाजपकडे ३ व राष्ट्रवादीकडे ३ असे पक्षीय बलाबल आहे. समान सदस्यसंख्या असल्यामुळे यापूर्वी सभापती निवड चिठ्ठी काढून करण्यात आली. यात धारूर पंचायत समिती राष्ट्रवादीच्या ताब्यात गेली. या ठिकाणीही आडसकर यांच्या भाजप प्रवेशाचा प्रभाव पडणार, असे दिसते. राष्ट्रवादीतील तीनपकी दोन सदस्य आडसकर गटाचे आहेत. साहजिकच भाजपचे संख्याबळ आता ५ होणार असून, राष्ट्रवादीच्या ताब्यातील पंचायत समिती भाजपच्या ताब्यात येईल, अशी स्थिती आहे.
गेवराईत १६ सदस्य आहेत. पकी आमदार अमरसिंह पंडित गटाचे १०, तर आमदार बदामराव पंडित गटाचे ६ सदस्य आहेत. या ठिकाणी अमरसिंह पंडित ठरवतील, तोच सभापती होणार आहे. येथील सभापतिपद खुल्या पुरुष प्रवर्गासाठी आहे. अंबाजोगाई पंचायत समितीवर सध्या भाजपचेच वर्चस्व आहे. येथील समितीत १२ सदस्य आहेत. पकी भाजपचे ९, राष्ट्रवादीचे २ व मनसेच्या एका सदस्याचा समावेश आहे, तो सदस्यही भाजपमध्ये गेल्यामुळे त्यांचे संख्याबळ १० झाले आहे. येथील सभापतिपद महिला खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित आहे. उषा किर्दत या पदाच्या दावेदार मानल्या जातात.
वडवणीत ४ सदस्य आहेत. पकी राष्ट्रवादीकडे २, भाजपकडे २ अशी स्थिती आहे. त्यामुळे येथील निवड सोडत पद्धतीने होईल. आष्टीत १४ सदस्य आहेत. पकी ९ राष्ट्रवादी, तर ५ भाजपचे आहेत. माजी आमदार भीमराव धोंडे व साहेबराव दरेकर यांच्या भाजप प्रवेशामुळे त्यांच्या गटाचे दोन सदस्य आता भाजपमध्ये सहभागी झाले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी व भाजपकडे प्रत्येकी ७ सदस्यसंख्या आहे. सभापतिपद अनुसूचित जाती-जमातीसाठी राखीव असून प्रियंका सावंत प्रबळ दावेदार आहेत. पाटोदा समितीत सभापतीची निवड करताना राज्यमंत्री सुरेश धस यांची कसरत होणार आहे. शिरूर पंचायत समितीवर सध्या भाजपचे वर्चस्व आहे. या ठिकाणी पुन्हा भाजपचीच सत्ता कायम राहण्याची चिन्हे आहेत. येथील सभापतिपद ओबीसी महिलेसाठी राखीव असून, मंडाबाई केदार या एकमेव ओबीसी महिला सदस्या असल्यामुळे त्यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे.
परळी पंचायत समितीवर भाजपचे वर्चस्व आहे. एकूण १०पकी ९ सदस्य भाजपचे आहेत. सभापतिपद सर्वसाधारण महिलांसाठी राखीव आहे. आमदार पंकजा मुंडे ठरवतील तोच सभापती येथे होणार आहे. बीडमध्ये पालकमंत्री जयदत्त क्षीरसागर यांचे पंचायत समितीवर वर्चस्व आहे. अठरापकी १२ सदस्य राष्ट्रवादीचे आहेत. येथे विद्यमान सभापती काकासाहेब जोगदंड यांनाच पुन्हा संधी मिळण्याची शक्यता आहे.