विकासकामांना चालना देताना श्रीवर्धन व रोहा तालुक्यापेक्षा मुरुड तालुक्याला अधिक संधी देऊन तातडीने निधी उपलब्ध करून देण्याचा माझा प्रयत्न असेल. मुरुडकरांच्या मागणीखातर मुरुड तालुक्यास क्रीडा संकुल मंजूर झाले आहे. यासाठी आपण क्रीडामंत्री वळवी यांची भेट घेऊन एक कोटी रुपये निधी प्राप्त झाला असल्याची माहिती सांगून विहूर येथील अडीच एकर जागेत हे क्रीडा संकुल होणार असून, तालुक्यातून चांगले खिळाडू निर्माण व्हावेत व आपल्या देशाचे नाव उज्ज्वल करावे अशी अपेक्षा जलसंपदामंत्री व रायगड जिल्ह्य़ाचे पालकमंत्री ना. सुनील तटकरे यांनी मुरुड येथे केले. नांदगाव-कोळीवाडा येथे मुस्लीम मोहल्ला ते तकई गल्लीतील रस्त्याच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर चिटणीस-स्मिता खेडेकर, नगराध्यक्षा- कल्पना पाटील, शहर अध्यक्ष- हसमुख जैन, उपाध्यक्ष- मंगेश दांडेकर, अतिक खतीब, अ‍ॅड. ईस्माइल घोले, फैरोज हालटे, तालुका अध्यक्ष- भरत बेलोसे, जिल्हा परिषद सदस्य- सुबोध महाडिक, पंचायत समिती सदस्य-अनंता ठाकूर, शहर अध्यक्षा निलोफर हमदुले, रमेश गायकर, संजय गुंजाळ, संदीप पाटील, महेश भगत, नीलेश घाटवळ आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी ना. तटकरे आपल्या भाषणात म्हणाले की, रायगड जिल्ह्य़ातील मच्छीमार सोसायटय़ांनी कागदपत्रांची पूर्तता करून शीतगृहाची मागणी केल्यास केंद्रीय कृषीमंत्री ना. शरद पवार यांच्याकडून निधी आणून देण्याचे काम निश्चित करू. मुरुड तालुक्यास पर्यटनाचा ‘ब’ दर्जा दिल्याने काशिद समुद्रकिनाऱ्यास एक कोटी रुपयांचा निधी देऊ शकलो. काशिदबरोबरच नांदगाव समुद्रकिनाऱ्याच्या विकासासाठी निधी देणार असल्याचे सांगितले. विहूर धरणाच्या मागील कामाच्या भ्रष्टाचाराबाबत मी बोलू इच्छित नाही, परंतु पुढील वर्षी ग्रामस्थांना चांगले व मुबलक पाणी मिळण्यासाठी मी आदेश दिले आहेत. त्याप्रमाणे येथे जोरदार काम सुरू आहे. यंदा विहूर धरणाचे पाणी आटले आहे त्यांना एप्रिल व मे महिन्यात पाणी मिळण्यासाठी मुरुड नपाच्या कोटय़ातून हे पाणी विहूर धरणापर्यंत पोहचवण्यासाठी तातडीच्या पाणीपुरवठा योजनेस मंजुरी देत असल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी नांदगाव समुद्रकिनाऱ्याची धूप थांबवण्यासाठी त्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून महाराष्ट्र मेरी टाइम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिंदे यांना भ्रमणध्वनी करून तातडीने निधी उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले. डोंगरी-राजपुरी रस्त्याला परवानगी लवकरच द्या, असा आदेश त्यांनी जिल्हा वनाधिकारी यांना दिला. या वेळी ना. तटकरे यांच्या हस्ते प्रियदर्शनी सोसायटी रस्ता क्राँक्रीटीकरण, लक्ष्मीखार स्मशानभूमी भिंत व स्लॅबचे शुभारंभ, पेठ मोहल्ला कब्रस्तान येथे सुशोभीकरण, लक्ष्मीखार जकात नाका संरक्षक भिंत शुभारंभ, इदगाह संरक्षकभिंत कामाचा शुभारंभ आदी कार्यक्रम करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्मिता खेडेकर यांनी तर आभार गोयजी यांनी व्यक्त केले. सदरील कार्यक्रमासाठी लोकांनी शेकडोच्या संख्येने गर्दी केली होती.