राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी सिक्कीमचे राज्यपाल म्हणून श्रीनिवास पाटील यांची नियुक्ती केल्यानंतर सिक्कीमचे १७वे राज्यपाल म्हणून त्यांचा शपथविधी पार पडला. सिक्कीम उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश पी. कुरिकोझे यांनी त्यांना शपथ दिली. सिक्कीमच्या राजभवनामधील आशीर्वाद हॉलमध्ये हा कार्यक्रम दिमाखात पार पडला.
मुख्यमंत्री डॉ. पवन चामलिंग, केंद्रीय कृषी राज्यमंत्री तारिक अन्वर, सिक्कीमचे विधानसभा अध्यक्ष पी. बी. राय, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, मुख्य सचिव, पोलीस महासंचालक, शासकीय उच्चपदस्थ अधिकारी या वेळी उपस्थित होते. शपथविधीनंतर राज्याच्या परंपरेनुसार मुख्यमंत्री डॉ. चामलिंग, मुख्य न्यायाधीश कुरिकोझे यांनी राज्यपाल पाटील यांचा रेशमी शाल (खादा) देऊन सत्कार केला. राज्यपाल पाटील यांना राजभवनाच्या परिसरात गोरखा रेजिमेंट व इंडो तिबेट सीमा पोलिसांच्या जवानांनी सलामी व मानवंदना दिली. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.