हेमामालिनी, शत्रुघ्न सिन्हा, स्मृती इराणी या स्टार प्रचारकांना कमी कालावधीत भाजपाचे कमळ जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचविण्यासाठी निवडणुकीच्या मदानात उतरविण्यात येणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातील ५६ मतदार संघांत प्रचाराचा धूमधडाका उडविण्याची जबाबदार प्रामुख्याने केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह आणि मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
या वेळी निवडणूक प्रचाराला अवघे बारा दिवस मिळणार असून महायुतीच्या फुटीनंतर प्रत्येक पक्षाला आपले चिन्ह मतदारांपर्यंत पोहोचविण्यासाठी कसरत करावी लागणार आहे. प्रचार सभांना लोकांना आकर्षति करण्यासाठी भाजपाने उमेदवारी दाखल करण्याची मुदत संपताच हालचाली सुरू केल्या आहेत.
काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये भाजपाने लक्ष केंद्रित केले असून या ठिकाणी पक्षाच्या स्टार प्रचारकांना मदानात उतरविण्यात येणार आहे. सिनेमा क्षेत्रातील वलयांकित अभिनेत्यांना प्रचारासाठी आमंत्रित करण्यात आले असून यामध्ये हेमामालिनी आणि शत्रुघ्न सिन्हा यांचा समावेश आहे. याशिवाय दूरचित्रवाणीच्या माध्यमातून घराघरात पोहचलेल्या आणि सध्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा मंत्री म्हणून कारभार पाहणाऱ्या स्मृती इराणी या प्रचाराची प्रमुख जबाबदारी सांभाळणार आहेत.
या निवडणुकीत भाजपा स्वबळावर मदानात उतरल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्रातील जाहीर सभा वाढविण्यात आल्या असून यापकी एक सभा सांगली व कोल्हापूर जिल्ह्यासाठी घेण्यात येणार आहे. याशिवाय पक्षाध्यक्ष अमित शहा यांचीही एक सभा आयोजित करण्यात येणार असून या दोघांपकी एकाची सभा तासगावमध्ये होणार आहे. तसेच प्रचारासाठी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडीयुराप्पा यांच्याही सभा आयोजित करण्यात येणार असल्याचे भाजपाचे पश्चिम महाराष्ट्र सह समन्वयक मकरंद देशपांडे यांनी सांगितले.