कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीचे वास्तव्य असलेल्या तीर्थक्षेत्र तुळजापूर येथे शहर व परिसरातील नागरिकांसह भाविकांसाठी तुळजाभवानी मंदिर संस्थानने मल्टीस्पेशालिटी दवाखाना सुरू करावा, अशी मागणी तुळजाभवानी पुजारी मंडळाचे माजी अध्यक्ष किशोर गंगणे व अ‍ॅड. शिरीष कुलकर्णी यांनी संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्याकडे केली आहे. भाविकांनी देवीचरणी अर्पण केलेल्या दीडशे कोटींहून अधिकचा निधी संस्थानकडे पडून असल्याचे गंगणे यांनी म्हटलं आहे.

तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या विश्वस्तांची गेल्यावर्षी २७ ऑगस्ट रोजी बैठक झाली होती. या बैठकीत तब्बल ११ कोटी रूपये खर्चून तुळजाभवानी देवीची भव्य मूर्ती साकारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्याला पुजारी मंडळाचे माजी अध्यक्ष किशोर गंगणे यांनी विरोध दर्शवत स्थानिक नागरिक व यात्रा काळात देवीच्या दर्शनासाठी येणार्‍या भाविकांसाठी सर्व सोयी-सुविधा असलेलं मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्याची लेखी मागणी केली होती.

करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार सर्वत्र दवाखाने सुरू करीत आहे. मात्र, संस्थानच्यावतीने अद्यापी एकही दवाखाना सुरू करण्यात आलेला नाही. करोना काळात व नंतर साथरोग काळात स्थानिक नागरिक यांच्यासाठी माफक दरातील हे हॉस्पिटल वरदान ठरणार आहे. शहर व परिसरात एकही चांगला दवाखाना नसल्याने अत्यवस्थ रूग्ण उस्मानाबाद किंवा सोलापूरला पाठवावे लागतात, त्यामुळे रूग्णांची हेळसांड होत असते.

तुळजापूर शहरात दवाखान्यासाठी शासकीय जमीनही उपलब्ध आहे. संस्थानकडे भाविकांनी देवीचरणी अर्पण केलेला दीडशेहून अधिक कोटींचा निधी पडून आहे. सरकारही सध्या दवाखाने सुरू करण्यासाठी निधी उपलब्ध करून देत आहे. त्यामुळे तुळजापुरात तत्काळ मल्टीस्पेशालिटी दवाखाना उभारण्यात यावा, अशी मागणी किशोर गंगणे व अ‍ॅड. शिरीष कुलकर्णी यांनी मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.