प्रकाशन व्यवसाय टिकवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न;  प्रकाशक-ग्रंथ विक्रेते-वाचक ही साखळी अडचणीत

पुस्तके ही ज्ञानाची अखंड वाहणारी गंगा आहे. तिच्या प्रवाहाने स्पर्शित समाज विचाराने श्रीमंत होतो, असे अभिमानाने सांगितले जायचे. परंतु ‘करोना’च्या काळच्रकाने ज्ञानाच्या या अखंड गंगेचा प्रवाहच अवरुद्ध करून टाकला आहे.

सध्या विषाणूमुळे निर्माण झालेल्या अनपेक्षित टाळेबंदीने प्रकाशन व्यवसायाचे  कंबरडेच मोडले असून घरपोच सेवा, विविध सवलतींचा वर्षांव करूनही ग्राहक मिळत नसल्याने समाजाला वैचारिक खाद्य पुरवणारे प्रकाशक कधी नव्हे ते चक्क हा व्यवसायच सोडून देण्याच्या निर्णयावर आले आहेत. अशी वेळ या उद्योगावर येणे हे समाजाच्या वैचारिक आरोग्याच्या दृष्टीने अपायकारक आहे.

या काळात रोहन प्रकाशनने आपल्या पुस्तकांवर ३३ टक्के सवलत जाहीर करून टाळेबंदीनंतर वाचकांना पुस्तके घरपोच देण्याची योजना आणली आहे. हा व्यवसाय टिकवण्यासाठी पुस्तकांची ‘पायरसी’ आणि ‘पीडीएफ कॉपी’ यावर सरकारच्या नियंत्रणाची गरज असल्याचे प्रकाशक सांगत आहेत. नागपूरच्या ‘विजय’ प्रकाशनचे सचिन उपाध्याय यांनी या संकटातून सावरण्यासाठी शासनाच्या मदतीची अपेक्षा करण्यापेक्षा वैयक्तिक वाचक जुळवण्यावर प्रकाशकांनी भर द्यावा, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

महिन्याभरातील तोटा

टाळेबंदीच्या कालावधीपासून ललित पुस्तक विक्रीत १५ ते २० कोटींचा फटका बसला असल्याची माहिती प्रकाशकांकडून मिळाली आहे.  १४ एप्रिलनंतर सुरळीत होईल असे गृहीत धरले तरी बाजारपेठेमध्ये ग्रंथखरेदीबाबत जी उदासिनता आहे, ती कशी दूर करता येईल, हा सर्वात मोठा प्रश्न आहे.

स्थिती काय?

महाराष्ट्रातील प्रकाशक-ग्रंथ विक्रेते-वाचक ही साखळी एकमेकांना पूरक असली तरी ‘करोना’ संकटाने सध्या ती कमकुवत झाली आहे. पुस्तक ही गरजेची वस्तू नसल्याने प्रकाशन आणि पुस्तक विक्री व्यवसायालाच भविष्यात पूर्ण टाळेबंदी लागण्याची भीती या परिस्थितीमुळे व्यक्त होत आहे.

.. तर प्रदर्शनेच बंद होतील

पुण्याच्या ‘अक्षरधारा’ परिवारातील आणि सध्या ‘शब्दांगण’ उपक्रमाद्वारे राज्यात पुस्तक प्रदर्शन भरवणारे लक्ष्मण राठीवडेकर यांनी मात्र करोनानंतर पुस्तक प्रदर्शन हा प्रकारच बंद होईल आणि या क्षेत्रात बेरोजगारी वाढेल, अशी भीती व्यक्त केली.

आम्ही सध्या समाजमाध्यमांवरून पुस्तकांचा प्रचार करीत आहोत.  १४ एप्रिलनंतर थोडी सवलत मिळाली तर वाचकांना त्यांच्या आवडीची पुस्तके पोहोचवता   येतील. प्रकाशन संस्थेच्या विविध कार्यक्रमांची इतिवृत्ते तसेच पुस्तकांविषयीचा गोषवारा देत वाचकांना आकर्षित करण्याचे काम घरात बसून केले जात आहे.

– डॉ. सदानंद बोरसे,  राजहंस प्रकाशन