गुरुवारपासून सलग सहा दिवस समुद्राला मोठे उधाण येणार आहे. त्यामुळे कोकण किनारपट्टीवरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. समुद्र खवळलेला असण्याची शक्यता असल्याने मच्छीमारांना खोल समुद्रात न जाण्याचा इशारा प्रादेशिक हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
जून महिन्याच्या १४ ते १८ तारखेदरम्यान समुद्राला मोठी उधाण येणार आहे. त्यामुळे समुद्र खवळलेला असण्याची शक्यता आहे. उधाणामुळे समुद्रात साडेचार मीटर उंचीच्या लाटा किनारपट्टीवरील भागात धडकण्याची शक्यता आहे. १४ जूनला दुपारी १.१७ वाजता ४.७६ मीटरची भरती येणार आहे. १५ जूनला दुपारी २.०३ वाजता ४.८६ मीटर उंचीचे उधाण अपेक्षित आहे, तर १६ जूनला दुपारी २.५० वाजता ४.८६ मीटर उंचीचे उधाण येणार आहे. १७ जूनला दुपारी ३.३६ वाजता ४.७४ मीटर उंचीचे तर १८ जूनला संध्याकाळी ४.२३ वाजता ४.५५ मीटर उंचीचे उधाण येणार आहे.  पुढील २४ तासांत समुद्रकिनाऱ्यावर ताशी ५० ते ५५ किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे समुद्र खवळलेला असणार आहे. त्यामुळे महाराष्ट्र  आणि गोवा किनारपट्टीवर धोक्याचा तीन नंबरचा बावटा जारी करण्यात आला आहे. मच्छीमारांनी खोल समुद्रात मासेमारी करण्यास जाऊ नये अशा सूचनाही प्रादेशिक हवामान विभागाकडून देण्यात आल्या आहे.
 रायगड जिल्ह्य़ात समुद्रकिनाऱ्यावरील ५३ गावे तर खाडीलगत ७२ गावे आहेत. या गावांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. आपत्कालीन परिस्थितीत ०२१४१-२२२११८ या जिल्हा नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक यांनी केले आहे.