विरार : विरार रेल्वे पुलावर भटक्या कुत्र्यांचा वावर वाढल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहेत. एका पिसाळलेल्या कुत्राने एकाच दिवशी १२ प्रवाशांना चावा घेतल्याची घटना गुरुवारी समोर आली आहे. भटक्या कुत्र्यांबाबत अनेकदा तक्रारी करूनही रेल्वे प्रशासन त्याची दखल घेत नसल्याने प्रवाशांमध्ये नाराजी आहे.

विरार रेल्वे स्थानक रेल्वे पुलावर, फलाटावर, तिकिटघराच्या जवळ भटक्या कुत्र्यांचे वास्तव्य आहे. विरार पूर्व येथील रहिवासी प्रवीण ठक्कर (५६) हे मुंबईला एका कामासाठी जात असताना विरार मुख्य तिकिटघर येथे एका कुत्र्याने ठक्कर यांच्या पायाला चावा घेतला. वसई विरार महापालिकेत केवळ एकच निर्बीजीकरण केंद्र सुरू असून ३ केंद्रे मागील तीन वर्षांपासून प्रलंबित आहेत. त्यावर अजूनही कोणताही निर्णय घेण्यात आला नाही.

रेल्वे स्थानकातील भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याचे पत्र आम्ही पालिकेला दिले आहे, असे पश्चिम रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी सांगितले तर आम्हाला रेल्वेकडून कुठलेही पत्र आलेले नसल्याचे  शहर अभियंता माधव जवादे यांनी सांगितले.