श्रीरामपूर : विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचा प्रकार उघड झाल्यानंतर संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी बुधवारी बेलापूर येथे विद्यार्थ्यांसह आंदोलन केले. अखेर विनयभंग करणाऱ्या शिक्षकाविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला.

बारावीच्या वर्गात शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीचा शिक्षकाने विनयभंग करण्याची घटना शनिवारी घडली होती. परीक्षा सुरू असताना या शिक्षकाने कॉपी तपासण्याच्या नावाखाली विनयभंग केला. मात्र या प्रकरणात माफीनामा घेऊ न हे प्रकरण मिटविण्यात आले होते. या प्रकाराची माहिती मिळताच आज गावकरी व विद्यार्थी संतप्त झाले. विद्यार्थी, पालक व ग्रामस्थांनी संबंधित प्राध्यापकावर कारवाईची मागणी करीत महाविद्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. संस्थेच्या वतीने रवींद्र खटोड यांनी सदर प्राध्यापकावर कारवाईचे आश्वासन दिले. संस्थेचे अध्यक्ष गणपत मुथा, शरद सोमाणी तसेच पंचायत समितीचे सदस्य अरुण नाईक, अभिषेक खंडागळे, सुधीर नवले, भरत साळुंके, देवीदास देसाई, प्रफुल्ल डावरे, गोपाल जोशी, मनोज श्रीगोड, जावेद शेख, भास्कर बंगाळ, विष्णूपंत डावरे, प्रकाश कुऱ्हे, अशोक गवते, प्रशांत शहाणे,दादा कुताळ या वेळी उपस्थित होते.त्यांनी घडलेल्या प्रकारचा निषेध करून संबंधित शिक्षकावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.

त्यानंतर ग्रामस्थांनी पोलीस चौकीवर आपला मोर्चा वळविला. तेथे पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांच्याशी चर्चा करून प्राध्यापकावर कारवाई करण्याची मागणी केली. या वेळी तरुणांनी महाविद्यालय व गाव बंदचा इशारा दिला. मात्र, गावाला वेठीस न धरता संबंधित प्राध्यापकावर कारवाई झाली पाहिजे, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली. ग्रामस्थ तसेच अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने पोलिसांना निवेदन देण्यात आले. बहिरट यांनीही कारवाईसाठी गावाला वेठीस धरू नये. योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर पीडितेच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून प्रा. बाबुराव पांडुरंग कर्णे (रा. बोरावके नगर ,श्रीरामपूर ) याच्याविरुद्ध यांच्याविरोधात शहर पोलीस ठाण्यात विनयभंग व अनुसूचित जातीजमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला. पुढील तपास पोलीस उपअधीक्षक राहुल मदने करीत आहेत.

बारावीच्या परीक्षेचे अंतर्गत गुण हे शिक्षकांच्या हातात असतात, ते देण्यासाठी कर्णे याने मुलीशी अश्लील  वर्तन केले असा आरोप करण्यात आला होता. फिर्यादीत शनिवारी दुपारी १२ ते २ या वेळेत जीवशास्त्र विषयाचा पेपर होता. त्या वेळी पर्यवेक्षक कर्णे हा होता. त्याने एका विद्यार्थिनीची कॉपी पकडली. त्यामुळे त्या मुलीस उठवून देण्यात आले. त्यानंतर दुसऱ्या विद्यािर्थनीच्या शेजारी कर्णे हा बसला. तिच्याशी अश्लील वर्तन केले. त्यानंतर विद्यार्थिनी पेपर अर्धवट सोडून निघून गेली. असे फिर्यादीत म्हटले आहे.