श्रीक्षेत्र भगवानगडाला जागतिक कीर्तीचे स्थळ बनवण्याचे स्वप्न केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांनी पाहिले होते. ते साकारण्यासाठी आपण प्रयत्न करू, असे आश्वासन देतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऊसतोडणी कामगारांच्या विकासासाठी मुंडे यांच्या नावाने स्थापन करण्यात आलेल्या महामंडळाचे मुख्यालय परळी (बीड) येथे करण्याचे जाहीर केले.
भगवानगडावरील (ता. पाथर्डी) संत भगवानबाबा यांच्या समाधिस्थळाच्या सुवर्णमहोत्सवी कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. या वेळी महसूलमंत्री एकनाथ खडसे, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे-पालवे, पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर, पालकमंत्री राम शिंदे, खा. दिलीप गांधी, खा. राजू शेट्टी, राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर, आ. शिवाजी कर्डिले व आ. मोनिका राजळे, गडाचे महंत डॉ. नामदेव शास्त्री आदी उपस्थित होते.
गडाच्या विकासासाठी ७ कोटी रुपयांच्या विकासकामांचा आराखडा तयार करण्यात आला आहे, त्यातील साडेतीन कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत, महामंडळाच्या माध्यमातून ऊसतोडणी मजुरांसाठी घरकुल, आरोग्य, निवृत्तिवेतन, त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी सुविधा आदी योजना राबवल्या जाणार असल्याची माहितीही फडणवीस यांनी दिली.  मुंडे-पालवे यांनी गडाच्या माध्यमातून माणसे घडवण्याचा तसेच योगविद्या, धर्मशास्त्र, किमान कौशल्याचे शिक्षण मिळावे तसेच कुप्रथा नष्ट करण्यासाठी प्रयत्न व्हावेत असे आवाहन केले.
खडसे यांनी भगवानगडाचा शिर्डी-शेगावच्या धर्तीवर विकास करणार असल्याचे जाहीर केले.  लोणीकर यांनी गडावरील पाणी योजनेसाठी २ कोटी रुपये मंजूर केल्याचे तसेच बीड व नगर जिल्ह्य़ांतील पाणीपुरवठा व स्वच्छतेसाठी १०० कोटी रुपयांची कामे केली जाणार असल्याचे जाहीर केले. खा. शेट्टी, जानकर यांचीही समयोचित भाषणे झाली. सचिव गोविंद घोळवे यांनी प्रास्ताविक केले.