यवतमाळ जिल्ह्यात शेतातील ऊस शॉर्टसर्किटमुळे आगीत जळून खाक झाल्याने हताश झालेल्या शेतकऱ्याने विषप्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना दिवाळीच्या दिवशी घडली. सुजित रमेश दहेकर (वय ४०) असे या शेतकऱ्याचे नाव असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

नेर तालुक्यात मांगलादेवी येथे राहणाऱ्या सुजित दहेकर यांच्याकडे सात एकर शेती असून यातील चार एकर शेतीत त्यांनी ऊसाची लागवड केली होती. ऊसाला १२ महिने पूर्ण झाले असून आता तो काढणीला आला होता. मात्र, दहेकर यांच्या शेतातून विजेच्या तारा जातात आणि यात शॉर्ट सर्किट झाल्याने बुधवारी त्यांच्या शेतातील ऊस जळून खाक झाला. यामुळे दहेकर यांचे पाच लाख रुपयांचे नुकसान झाले. यामुळे हताश झालेल्या दहेकर यांनी घरी गेल्यावर विषप्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांना तातडीने नेर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथून पुढील उपचारासाठी यवतमाळमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नेण्यातत आले. याप्रकरणी तहसीलदार यांना निवेदन देऊन नुकसान भरपाईची मागणी करणार असल्याचे दहेकर यांच्या नातेवाईकांनी सांगितले.