चौपदरीकरणाचे काम सुरू असलेल्या मुंबई-गोवा महामार्गावर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि ठेकेदार कंपनी सुप्रीम व महावीर यांच्या हलगर्जीपणामुळे रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. त्यांच्या हलगर्जीपणामुळे पडलेल्या खड्डय़ांमुळे ठिकठिकाणी अपघात होत आहेत. त्यामुळे १ ऑगस्टपर्यंत सदर खड्डे भरून वाहतूक सुरळीत न केल्यास संबंधित अधिकारी व ठेकेदारांवर हलगर्जीपणाबद्दल गुन्हे दाखल करण्याची तंबी जलसंपदामंत्री तथा रायगडचे पालकमंत्री सुनील तटकरे यांनी दिली आहे.
मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरवस्थेसंदर्भात सुनील तटकरे यांनी आज तातडीने अधिकाऱ्यांची बठक बोलावली होती, त्या वेळी ते बोलत होते. या बठकीला जिल्हाधिकारी एच. के. जावळे, पोलीस अधीक्षक अकुंश िशदे, जि. प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अण्णासाहेब मिसाळ महामार्ग प्राधिकरणचे प्रकल्प संचालक वाटोरे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्या वतीने सदर कामाचा ठेका सुप्रीम तसेच महावीर या ठेकेदार कंपन्यांनी घेतला आहे. मात्र काम सुरू असताना ठिकठिकाणी महामार्गावर पडलेल्या खड्डय़ांमुळे महामार्गाची पार दुरवस्था झाली आहे. या खड्डय़ांमुळे अनेक लहान-मोठे अपघात घडत असून, यात मोठय़ा प्रमाणावर जीवितहानी होत आहे. तसेच जखमींचे प्रमाणही मोठे आहे. त्याचप्रमाणे महामार्गावर मोठय़ा प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्याचे दिसून येते. या साऱ्या प्रकारामुळे पालकमंत्री सुनील तटकरे संतप्त झाले असून, त्यांनी याबाबत गंभीर दखल घेतली आहे.
 राष्ट्रीय महामार्गाच्या दुरवस्थेबाबत नामदार तटकरे यांनी सर्व अधिकाऱ्यांची बठक तातडीने बोलाविली होती. या बठकीत त्यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले. रस्त्यांवर पडलेले खड्डे हे संबंधित अधिकारी तसेच महावीर व सुप्रीम या ठेकेदार कंपन्यांच्या हलगर्जीपणामुळे पडले आहेत. त्यामुळे होणाऱ्या अपघातांनादेखील तेच जबाबदार आहेत.
१ ऑगस्ट २०१३ पर्यंत या महामार्गावरील खड्डे बुजवून वाहतूक सुरळीत करण्याचे आदेश पालकमंत्री सुनील तटकरे यांनी या बठकीत दिले. सदर मुदतीत खड्डे बुजवून वाहतूक सुरळीत न केल्यास संबंधित अधिकारी व ठेकेदार कंपन्यांवर हलगर्जीपणाचा गुन्हा नोदंविण्याची तंबीदेखील ना. तटकरेयांनी दिली.
सप्टेंबर महिन्यात गौरी-गणपती या कोकणातील महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या सणाला या महामार्गावरून मुंबई-पुण्यातून हजारो चाकरमानी प्रवास करतात. यामुळे त्यांच्या सुरक्षित प्रवासाच्या दृष्टीनेदेखील या महामार्गाची दुरुस्ती होणे आवश्यक आहे. त्यामुळे पालकमंत्री सुनील तटकरेयांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेचे रायगडसह कोकणवासीयांकडून स्वागत केले जात आहे.