लाचेच्या मागणीची तक्रार नोंदवल्यानंतर अवघ्या सहा तासांत नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सायंकाळी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील लाचखोर वरिष्ठ लिपिकास रंगेहाथ पकडले. विशेष म्हणजे जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारातच ही कारवाई करण्यात आली. आणखी विशेष म्हणजे यातील तक्रारदार हा सेवानिवृत्त पोलीस हवालदार आहे. गेल्या आठ महिन्यांत पथकाने २८ लाचखोर अधिकारी, कर्मचारी गजाआड केले आहेत.
निवृत्त हवालदाराने सकाळी १० वाजता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली. विभागाच्या पथकाने लगेच वेगवान हालचाली करून सापळा आयोजित केला आणि सायंकाळी सव्वाचारच्या सुमारास लिपिकास पकडलेही. नगर विभागाच्या इतिहासात पथकाने प्रथमच इतक्या त्वरेने पावले उचलली गेली असावीत. विनोद श्रीकृष्ण वानखेडे (वय ३८, रा. तपोवननगर, नगर) असे या लिपिकाचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक कार्यालयाची नूतन इमारत उभी राहिली असली तरी अद्याप कार्यालयलगतच्या जुन्या वाहतूक शाखेच्या ठिकाणी आहे. तेथेच विभागीय चौकशीचाही कक्ष आहे. या कक्षात वानखेडे वरिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत होता. सेवानिवृत्त हवालदाराच्या ३०० दिवसांच्या हक्क रजा रोखीकरणाचे बिल प्रलंबित होते. त्यासाठी वानखेडेच्या ना हरकतची आवश्यकता होती. त्यासाठी तो १ हजार रुपयांच्या लाचेची मागणी करत होता. त्याला ही रक्कम स्वीकारताना पथकाने पकडले.
पथकाचे पोलीस उपअधीक्षक अशोक देवरे यांच्या नेतृत्वाखाली निरीक्षक चंद्रशेखर सावंत, हवालदार वसंत वाव्हळ, राजेंद्र सावंत, जरे, श्रीपाद जरे, कल्याण गाडे, सुनील पवार, एकनाथ आव्हाड यांच्या पथकाने ही कारवाई केली.