आठव्या लेखिका साहित्य संमेलनाचे उद्घाटन

शाहू, फुले, आंबेडकरांचा वारसा सांगितला जात असला तरी आज परिस्थिती चिंताजनक आहे. दाभोळकर, पानसरे यांच्या हत्या ही समाजासाठी चिंतेची बाब असून मनुवादी विचार पुन्हा डोके वर काढत आहेत. त्यामुळे प्रत्येकाने व्यक्त झाले पाहिजे, तरच समाज टीकून राहील. साहित्यातून समाजाला दिशा देण्याचे काम होते. साहित्यिकांची अनेकदा टोकाची भूमिका असली तरी राजकारण्यांना धोरण ठरवण्यासाठी महत्त्वाचे असते, असे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले.

बीड येथे मराठवाडा साहित्य परिषदेच्या आठव्या लेखिका साहित्य संमेलनाचे उद्घाटन शनिवारी कान्होपात्रा विचारमंचावर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते झाले. या वेळी संमेलनाच्या अध्यक्षा डॉ.दीपा क्षीरसागर, मावळत्या अध्यक्षा वृषाली किन्हाळकर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यां विद्या बाळ, स्वागताध्यक्षा अ‍ॅड. उषा दराडे, मसापचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील, आमदार जयदत्त क्षीरसागर, अमरसिंह पंडित आदी उपस्थित होते.

‘पन्नास वर्षांपूर्वी कोणतेही आरक्षण नसताना दिवंगत केशरबाई क्षीरसागर यांनी सरपंच पदापासून खासदारकीपर्यंत आपले कर्तृत्व सिध्द केल्याने त्या महिलांच्या प्रेरणा ठरल्या. महिलांना समान अधिकार मिळण्यासाठी समाजवादी विचारांची नितांत गरज असून महिलांच्या सक्षमीकरणासाठी पुरुषांचे पाठबळ आवश्यक आहे. शरद पवार यांनी एका मुलीच्या जन्मानंतर स्वतवर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करुन राज्यकर्त्यांसमोर आदर्श घालून दिला. महाराष्ट्र हा डॉ.बाबासाहेब आंबेडकर, ज्योतिबा फुले, शाहू महाराज यांच्या विचारांचा वारसा सांगणारा आहे. मात्र, आज या महापुरुषांचे विचार खऱ्या अर्थाने रुजले आहेत का, असा प्रश्न पडतो. मागील काही दिवसात राज्यातील परिस्थिती गंभीर बनली आहे. जाती-जातीत द्वेष निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू असल्याने पुन्हा एकदा मनुवादी विचार डोके वर काढत आहे,’ असे खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या. साहित्यिक समाजाला दिशा देण्याचे काम करतात. त्यांची अनेकदा टोकाची भूमिका असते, तरी राज्यकर्त्यांसाठी ती महत्त्वाची असते. पुरोगामी विचार हा भाषणातून आणि वाचनातून नव्हे, तर कृतीतून अभिव्यक्त होणे आवश्यक आहे. सरकारने मराठी शाळा बंद करण्याचा घातलेला घाट सर्वानी उधळून लावण्याचे आवाहनही त्यांनी केले. मोबाइलमुळे नात्यांमधील ओलावा कमी होत असल्याची खंत व्यक्त करुन महिलांनी मोकळेपणाने व्यक्त होणे आवश्यक असल्याचेही त्या म्हणाल्या.  डॉ.वृषाली किन्हाळकर यांनी मराठवाडय़ातील महिला लिहीत आहेत, अभिव्यक्त होत आहेत. मात्र, साहित्याकडे प्रसिध्दीचे माध्यम म्हणून पाहू नये, असे आवाहन करुन आपण अठराव्या वर्षी लिहिलेले साहित्य अडोतिसाव्या वर्षी प्रसिद्ध केले. साहित्य हे मुरले पाहिजे. स्वतचे भाव, दुख व्यक्त करता आले पाहिजे. प्रत्येकाला घाई झाल्यामुळे संयम शिकवणे आवश्यक असल्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. साहित्यिक दिशा शेख यांनी स्वतच्या कवितेतून स्त्रियांवर होत असलेल्या अन्याय अत्याचाराला वाचा फोडताना उपस्थितांना अंतर्मुख केले. महिलेला आरक्षणाने पद मिळाले असले तरी तिला छापील भाषण बदलण्याचे स्वातंत्र्य अद्याप नसल्याचे स्पष्ट केले. संमेलनाध्यक्षा डॉ.दीपा क्षीरसागर यांनी महिलांना अभिव्यक्त होण्यासाठी साहित्य हे उत्तम माध्यम असून साहित्य, संस्कृती, परंपरेचा उल्लेख करत लेखिका साहित्य संमेलनामुळे महिलांना व्यक्त होण्याची संधी मिळाली असल्याचे सांगितले. स्वागताध्यक्षा अ‍ॅड. उषा दराडे यांनी स्त्रियांचे प्रश्न उपस्थित करतांना महिलेच्या अंगावर किलोभर सोने असले तरी तिला एक फुटका मणी विकण्याचीही परवानगी नसते. मात्र, समाजात सारेच काही निराशाजनक नाही. परंतु सत्य मान्य केले पाहिजे असे सांगून संमेलनातून महिलांना व्यक्त होण्याची अधिक प्रेरणा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली. या वेळी नऊ कर्तृत्ववान महिलांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तर अ‍ॅड. उषा दराडे यांच्या ‘घायाळ दंश’ पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. सकाळी ग्रंथिदडीने संमेलनाची सुरुवात झाली. यशवंतराव चव्हाण नाटय़गृहाच्या परिसरात ग्रंथप्रदर्शनही भरवण्यात आले आहे.