03 March 2021

News Flash

हवाला गैरव्यवहारप्रकरणी सुरेश धुरपते यांना अटक

एकूण ११ जणांना यापूर्वीच अटक करण्यात आली

तब्बल ३९० कोटी रुपयांची निर्यात करातील अवैध सूट तसेच हवाला गैरव्यवहारप्रकरणी भाळवणी पंचायत समिती गणाच्या सदस्या सुनंदा धुरपते यांचे पती सुरेश उर्फ सूर्यभान धुरपते यांना महसूल गुप्तवार्ता संचालनालयाने मुंबईत अटक केली. या गरव्यवहारप्रकरणी धुरपते यांना गेल्या जून महिन्यातच नोटीस बजावण्यात आली होती. त्यामुळे भारत सोडून दुबईकडे पलायन करण्याच्या तयारीत असलेल्या धुरपते यांना मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरच जेरबंद करण्यात आले.

धुरपते यांच्या मुंबईतील संकेत ओव्हरसीज या खासगी कंपनीमार्फत आयात-निर्यात व्यापारातील क्लिअिरग एजंटचे काम पाहिले जात होते. शासकीय करावर नकली चलन फॉर्मद्वारे अवैधरीत्या सूट मिळवणाऱ्या निर्यातदारांच्या रॅकेटशी धुरपते यांच्या संकेत ओव्हरसीजचे संबंध होते. बनावट चलन फॉर्म भरून देण्यात येऊन ५ हजार डॉलपर्यंतची रक्कम देशात आणण्याचे काम गेल्या काही वर्षांपासून सुरू होते. बनावट चलन फॉर्म कस्टम अधिकाऱ्यांनी पारित केल्यानंतर परदेशी चलन बँकेत जमा केले जात असे. या व्यवहारात व्यापारी आपली निर्यात जास्त दाखवून जास्त नफा कमवण्याचा धंदाही करण्यात येत होता. १०० रुपये मूल्याच्या वस्तूची किंमत अनेकपटींनी अधिक असल्याचे भासवूनही शासनास गंडा घालण्यात येत असे.

महसूल गुप्त वार्ता विभागास या रॅकेटची कुणकुण लागल्यानंतर त्यातील एकूण ११ जणांना यापूर्वीच अटक करण्यात आली असून, त्यात एका राष्ट्रीयीकृत बँकेच्या व्यवस्थापकाचाही समावेश आहे, तर धुरपते यांच्या नावे तपास, शोध व अटकेसाठी गेल्या जून महिन्यात नोटीस बजावण्यात आली होती. नोटीस बजावण्यात आल्यानंतर संचालनालयाने उपस्थित केलेल्या विविध प्रश्नांची उत्तरे देताना धुरपते यांची भंबेरी उडाली होती. त्यांच्यावर कारवाईची टांगती तलवार असतानाच ते देश सोडून दुबईत पलायन करण्याच्या तयारीत होते. गुप्तवार्ता संचलनालयाचे पथक मात्र त्यांच्या मागावरच होते. गेल्या महिन्यात धुरपते हे दुबई येथे जाण्यासाठी मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचले. त्यांच्या पासपोर्टची पडताळणी सुरू असताना विमानतळ अधिकाऱ्यांनी महसूल संचलनालयाच्या अधिकाऱ्यांना सावध केले व दुबईच्या विमानाने उड्डाण करण्यापूर्वीच ते विमातनतळ सुरक्षा तसेच महसूल संचालनालयाच्या सापळय़ात अलगद अडकले.

अवैध मार्गाने निर्यात करून गरव्यवहार करणाऱ्या व्यापाऱ्यांचे प्रमुख हस्तक म्हणून धुरपते हे कार्यरत होते. हवालामार्फत व्यवहारासाठीही धुरपते यांचेच संबंध कार्यरत होते. त्यातून अनेक व्यापाऱ्यांनी शासनाच्या कोटय़वधींच्या करास चुना लावला आहे. रूमस्टर ट्रेडिंग प्रा. लि., बॉल्टन ट्रेडालिंक प्रा.लि., अल-हिंद एक्स्पोर्ट्स अँड इम्पोर्ट्स व सिस्की रेमन्ट्स या कंपन्या या गरव्यवहारात गुंतल्या आहेत. धुरपते यांना ताब्यात घेतल्यानंतर हवालामार्फत व्यवहार झाल्याची कबुलीही त्यांनी दिली आहे.

असा चालायचा गैरव्यवहार

चलन घोषणापत्राचा फॉर्म भारतीय प्रवाशांच्या परकीय चलनाच्या घोषणेसाठी वापरण्यात येतो. धुरपते हा वैध प्रवाशांचे पासपोर्ट वापरून बनावट चलन फॉर्ममध्ये त्याची माहिती वापरत असे. धुरपते याच्याकडे अनेक पासपोर्ट आढळून आले असून, संबंधितांशी संपर्क करण्यात आल्यानंतर त्यांनी कोणासही परकीय चलन विकले नसल्याचे संचलनालयाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. आतापर्यंत ३९० कोटींचा गरव्यवहार उघडकीस आला असून, संचनालयाकडून अजूनही झालेल्या गरव्यवहाराची मोजदाद सुरू आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 14, 2018 1:24 am

Web Title: suresh dhurpate arrested for hawala fraud
Next Stories
1 गिरीश बापटांना बेताल वक्तव्यांची किंमत मोजावी लागेल – अजित पवार
2 मीच राजा; रामदास आठवले म्हणजे कागदी वाघ- प्रकाश आंबेडकर
3 भाजपाच्या दबावामुळे शिवसैनिकांवर खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत- चंद्रकांत खैरे
Just Now!
X