सोलापूर : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी गेली ४०-४५ वर्षे राज्यात व केंद्रातील सत्ताकारणात अनेक मोठय़ा जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. राज्यमंत्री, कॅबिनेट मंत्री, मुख्यमंत्री ते राज्यपाल व केंद्रात ऊर्जामंत्री व गृहमंत्री आणि थेट लोकसभेचा नेता म्हणून त्यांनी जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. आता त्यांचे वय ७९ वर्षांचे झाले आहे. खरे पाहता त्यांनी आता लोकसभा निवडणुकीला पुन्हा उभे राहण्यापेक्षा वृध्दापकाळाचा  विचार करता त्यांनी राजकीय निवृत्ती घेऊन थेट अध्यात्मात यावे, अशी सल्लावजा सूचना शिवसेनेच्या उपनेत्या, आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली आहे.

सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार डॉ. जयसिध्देश्वर शिवाचार्य महास्वामीजींच्या प्रचारार्थ आयोजित विजय संकल्प मेळाव्यात बोलताना डॉ. गोऱ्हे यांनी सुशीलकुमार शिंदे यांनी एवढी वर्षे सत्तेत राहूनही सोलापूरच्या विकासाकडे दुर्लक्षच केले. येथील यंत्रमाग उद्योगाची व एकूण वस्त्रोद्योगाची अधोगती त्यांना सहजपणे थोपविता आली असती. ती त्यांनी जाणीवपूर्वक टाळली. सोलापुरातील सुमारे ७० हजार महिला विडी कामगारांचे ‘जळते जिणे’ ‘लोकसत्ता’मधून वाचावयास मिळाले. महिला विडी कामगारांची ही विदारक स्थिती थोपविण्याची इच्छा शिंदे यांना कशी होत नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

या मेळाव्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यासह  सोलापूरचे पालकमंत्री विजय देशमुख, सहकारमंत्री सुभाष देशमुख, आमदार प्रशांत परिचारक, अकलूजचे धैर्यशील मोहिते-पाटील, शिवसेनेचे उपनेते आमदार तानाजी सावंत, जिल्हा प्रमुख महेश कोठे, माजी महापौर किशोर देशपांडे आदींची उपस्थिती होती. यावेळी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी आपले पालकमंत्री विजय देशमुख यांच्याशी कसलेली मतभेद नाहीत, कसलेली भांडण नाही, आम्ही एकोप्यानेच काम करतो. परंतु प्रसार माध्यमेच चुकीच्या बातम्या देतात, असा दावा केला. त्याचा धागा पकडून आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी, सोलापूरची प्रसारमाध्यमे कशी आहेत, हे आपणांस अनेक वर्षांपासून ज्ञात आहे. येथील पत्रकारिता सकारात्मक आहे. त्याचा अनुभव आपण नेहमीच घेतला आहे. जर कोणी पत्रकार नकारात्मक बातम्या देत असतील त्याकडे दुर्लक्ष करून आपला एकोपा प्रामाणिकपणे टिकवत काम करा, असा सल्ला देत त्यांनी देशमुख यांचा दावा खोडण्याचा प्रयत्न केला. यावेळी भाजपचे  प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी देशासमोर दहशतवाद्यांसह एकूण सुरक्षिततेचा धोका आहे. त्यामुळे देशाचे नेतृम्त्व तेवढय़ाच समर्थपणे व भक्कमपणे करायला नरेंद्र मोदी यांना पर्याय नाही, असा दावा केला. त्यांनी दोन्ही काँग्रेससह अन्य विरोधकांवर टीकास्त्र सोडले.