शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचा येथील श्रद्धा मोबाइल दुकानाचे मालक सुभाष पवार यांच्या खूनप्रकरणी मुख्य संशयित विष्णू तिरसिंग वळवीला (रा. कन्साई, म्हसावद) पोलिसांनी अटक केली.
दरम्यान, याप्रकरणी आधीच अटक करण्यात आलेल्या दोन संशयितांची न्यायालयाने पाच दिवसांसाठी पोलीस कोठडीत रवानगी केली.
१ जूनला रात्री छत्रपती शिवाजी महाराज पुतळा रस्त्यावरील श्रद्धा मोबाइल व पानसुपारी दुकानाचे मालक पवार यांचा दगडाने ठेचून खून झाला होता. या घटनेनंतर त्यांच्या दुकानातील मोबाइलदेखील लंपास करण्यात आले होते.
त्या पाश्र्वभूमीवर, दोंडाईचा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. जबरी चोरी व खून प्रकरणातील आरोपीचा सुगावा लावण्यासाठी श्वान पथक मागविण्यात आले होते, परंतु पोलिसांना संशयितांना शोधण्यात अपयश आले.
यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक चतन्या एस. उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाधिकारी सहायक निरीक्षक संतोष इंगळे, उपनिरीक्षक आशीष खांडेकर यांच्या पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पोलिसांनी यापूर्वी योगेश ऊर्फ विठ्ठल पारधी (रा. म्हाळसानगर, दोंडाईचा) आणि शांतीलाल गेंद्या ठाकरे (मालपूर रोड, दोंडाईचा) यांना अटक केली आहे.