अवैध दारू वाहतुकीविरोधात उत्पादन शुल्क विभागाने व्यापक कारवाईला सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे गेल्या दोन दिवसांत उत्पादन शुल्क विभागाने अवैध दारू उत्पादन आणि वाहतूक केल्या प्रकरणी ४० गुन्ह्यांची नोंद केली असून २४ जणांना अटक करण्यात आली आहे. देशी आणि विदेशी दारूंचा मोठा साठाही यांच्याकडून जप्त करण्यात आला आहे. रायगड जिल्हा उत्पादन शुल्क विभागाने गावठी दारू व अवैध दारू विक्रीविरोधात धडक मोहिमेला सुरुवात केली आहे. दोन दिवसांत विविध ठिकाणी छापे टाकून १५ लाख ५५ हजार मुद्देमालही जप्त केला आहे. रायगड जिल्ह्यात ५ ऑक्टोबरला विविध ठिकाणी टाकलेल्या धाडींमध्ये ४ लाख ३६ हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला. या एका दिवसात उत्पादन शुल्क विभागाने २० गुन्ह्यांची नोंद केली. यात ९ वारस तर ११ बेवारस गुन्ह्यांचा समावेश होता. या कारवाई ४ हजार ६०० बल्क लिटर रसायन, ६३३ बल्क लिटरची गावठी दारू, ६० किलो काळा गूळ, गोवा बनावटीच्या ३२ बल्क लिटर विदेशी मद्य जप्त करण्यात आले. या प्रकरणांमध्ये १० जणांना अटक करण्यात आली. तर ६ ऑक्टोबरला टाकलेल्या धाडींमध्ये उत्पादन शुल्क विभागाने ११ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. या एका दिवसात उत्पादन शुल्क विभागाने २० गुन्ह्यांची नोंद केली. यात १२ वारस तर ८ बेवारस गुन्ह्यांचा समावेश होता. या कारवाई २ हजार ८१७ बल्क लिटर रसायन, १६० बल्क लिटरची गावठी दारू, गोवा बनावटीचे ४८ बल्क लिटर विदेशी मद्य, ७३ बल्क लिटरची बीअर जप्त करण्यात आली. या प्रकरणांमध्ये १४ जणांना अटक करण्यात आली. दोन दिवसांतील कारवाईत अवैध दारू वाहतुकीसाठी वापरण्यात येणारी सात वाहनेही जप्त केली. यात प्रामुख्याने बलेरो जीप, १ टाटा मॅझिक, १ तीन चाकी टेम्पो, ३ मोटरसायकल आणि १ स्कुटी यांचा समावेश आहे. जिल्ह्य़ात गावठी आणि अवैध दारू वाहतुकीविरोधात उत्पादन शुल्क विभागाने गांधी जयंतीचे औचित्य साधून ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. गेल्या दोन दिवसांत या मोहिमेला चांगले यश आले आहे. कारवाईचा हा ट्रेण्ड असाच सुरू ठेवण्याचा आमचा मानस आहे, अशी माहिती उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नीलेश सांगडे यांनी दिली. आगामी काळात अवैध दारूची वाहतूक व विक्री रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक कारवाई केली जाणार आहे. वाहनांची तपासणी कसून तपासणी केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.