गावात टँकर आले होते का, या प्रश्नाचे उत्तर विचारत वैजापूर, गंगापूर आणि पैठणसह वेगवेगळ्या तालुक्यांतील टँकर तपासणीच्या पाहणीत वाहनचालकाकडे ना लॉगबुक सापडले, ना फेऱ्यांच्या नोंदी! काही गावांमध्ये टँकरने केलेला पाणीपुरवठा कमी प्रमाणात असल्याचे दिसून आले. कारण टँकरची क्षमता कराराप्रमाणे नव्हतीच. वेगवेगळ्या अनियमिततांना तातडीने दुरुस्त करण्याच्या सूचना जि. प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दिल्या. गटविकास अधिकाऱ्यांना पत्र लिहून पाहणीतील निष्कर्ष कळविण्यात आले. या तपासणीमुळे टँकर पुरवठय़ातील घोटाळे समोर आले.
शासकीय टँकर न वापरता औरंगाबाद जिल्ह्य़ात सुरू असणाऱ्या घोळाबाबत वरिष्ठांकडून प्रश्नचिन्ह लावले जात होते. जिल्ह्य़ात ३१ पैकी ९ टँकर बंद ठेवण्यात आले. नांदेड जिल्ह्य़ात ही संख्या सर्वाधिक आहे. तुलनेने जायकवाडीसारखा मोठा प्रकल्प जिल्ह्य़ात असतानाही सर्वाधिक २१७ टँकरने पाणीपुरवठा होत आहे. प्रत्येक टँकरवर जीपीएस प्रणाली बसवावी, अशा सूचनाही देण्यात आल्या. त्याची अंमलबजावणी झाली की नाही, याची माहितीही तपासणीदरम्यान घेण्यात आली.
जिल्ह्य़ातील ७० गावांमधून टँकरसंबंधातील पाहणीसाठी पथके गठीत करण्यात आली. या पथकांनी केलेल्या पाहणीत टँकरच्या लॉगबुकवर ग्रामसेवक व सरपंचांच्या सह्य़ा नव्हत्या. पंचायत समिती स्तरावरील नोंदही नीट नव्हती. काही ठिकाणी १२ हजार लिटरचे टँकर पुरविण्याऐवजी साडेआठ ते ९ हजार लिटर क्षमतेने पाणीपुरवठा केला गेला. प्रतिटन प्रतिकिलोमीटर १ रुपये ९३ पैसे असे असल्याने देयके देताना जेवढय़ा क्षमतेचा टँकर त्याप्रमाणातच रक्कम मंजूर करावी, असे आदेशित करण्यात आले. या अनुषंगाने पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता रबडे म्हणाले की, तपासणी करून कोठे काय आढळले याचा अहवाल मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे दिला आहे. गटविकास अधिकाऱ्यांनाही अनियमितता दूर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.