विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासासाठी शिक्षकांनी प्रामाणिक प्रयत्न करायला हवेत. इंग्रजी माध्यम हे जागतिक स्पर्धेत टिकण्याचे माध्यम असल्याने पालक व शिक्षकांनी विद्यार्थ्यांचा इंग्रजी शिक्षणाचा पाया भक्कम बनविण्याचे आवाहन राजमाता सत्त्वशीलादेवी भोसले यांनी केला.
दक्षिण रत्नागिरी जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचालित मदर क्वीन्स के. जी. आणि प्रायमरी स्कूल सावंतवाडीचे वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षीसवितरणप्रसंगी राजमाता सत्त्वशीलादेवी भोसले बोलत होत्या. या वेळी पानवळ गोगटे विद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. बी. सावंत, संस्था सचिव प्रा. एम. डी. देसाई, उपाध्यक्ष पी. एफ. डान्टस, प्रभारी प्राचार्य जी. एम. शिरोडकर, प्रा. बी. एन. हिरामणी, प्रा. आर. बी. शिंत्रे, एल. एम. सावंत व मुख्याध्यापिका अनुजा साळगावकर उपस्थित होत्या.
विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासात शिक्षकांनी प्रयत्न करताना खेळ , कला या गुणांनाही वाव द्यावा. मुलांच्या करिअरमध्ये शिक्षणाचा पाया मजबूत करताना खेळ, कला यांचे महत्त्व आहे. इंग्रजी माध्यमाचा पाया जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी महत्त्वाचा आहे, असे राजमाता भोसले म्हणाल्या.
या वेळी बांदा गोगटे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. बी. सावंत यांनी विद्यार्थी व पालक यांना मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक केले. मुख्याध्यापिका अनुजा साळगावकर यांनी प्रास्ताविक करून मान्यवरांचे स्वागत केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुजाता सावंत व सिन्ड्रेला परेरा यांनी केले. या कार्यक्रमाचे नियोजन प्रशालेच्या शिक्षिका आकाशवाणी सावंत, क्लारा डिसोजा, सोनल गाड, जानव्ही सावंत, लविना अलमेडा यांनी केले. आभार रमणी गावडे यांनी केले.