पाचोरा तालुक्यातील नंदीचे खेडगाव येथील एच. बी. हायस्कूलमध्ये नुकतेच दहावीचे गुणपत्रक वितरित करण्यात आले. या गुणपत्रकांसाठी प्रत्येक विद्यार्थ्यांकडून शंभर रुपयांची वसूली करण्यात आली. जमा झालेल्या पैशांतून शिक्षकांनी सायंकाळी शाळेच्या आवारात ओल्या पार्टीचे आयोजन केले होते. त्यात शिक्षकांनी धिंगाणा घालत एकमेकांचे कपडे फाडले. ही बाब ग्रामस्थांच्या लक्षात आल्यावर सरपंचासह त्यांनी शाळा गाठून या प्रकाराची शहानिशा केली असता सर्व शिक्षकांनी तेथून पळ काढला.
खेडगाव नंदीचे येथील हरकचंद बिरदीचंद संघवी या हायस्कूलमध्ये झालेल्या धक्कादायक प्रकाराची माहिती आमदार दिलीप वाघ यांच्यासह गट शिक्षणाधिकाऱ्यांना कळविण्यात आली. या घटनेची गांभीर्याने चौकशी व्हावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. शाळेतील पाचवीच्या एका वर्गात पार्टीची तयारी केली गेली. मटन शिजविण्यासाठी तयार करण्यात आलेल्या व्यवस्थेसह दारू व बिअरच्या रिकाम्या बाटल्या शाळेच्या आवारात आढळून आल्या. शाळेच्या मुख्याध्यापकांसह नऊ शिक्षकांनी केलेल्या या पार्टीच्या घटनेचा निषेध करत दोषींवर कठोर कारवाई व्हावी, यासाठी ग्रामपंचायतीने ठराव केला. पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेची नंदीचे खेडगाव येथे एच. बी. संघवी हायस्कूल ही शाखा आहे. शनिवारी सकाळी शिक्षक शाळेत आल्यावर आवारात सर्व ग्रामस्थ जमा झाले. त्यांनी शिक्षकांना रात्रीच्या पार्टीबद्दल जाब विचारण्यात आला. या घटनेची दखल घेत शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांना चौकशीसाठी पाठविण्यात आले असून याबाबतचा अहवाल लवकरच सादर केला जाणार आहे.