भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश विस्तारित कार्यकारिणीची बैठक आता येत्या २८ जानेवारी रोजी एकच दिवस जालना येथे होणार आहे. कारण त्याआधी २७ जानेवारी रोजी सायंकाळी औरंगाबाद येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या देवगिरी प्रांताच्या प्रतिनिधींची बैठक होणार आहे.

भाजपच्या जालना येथील बैठकीसाठी येणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्र आणि राज्यातील मंत्री तसेच पक्षाचे महत्त्वाचे पदाधिकारी २७ जानेवारी रोजी सायंकाळी औरंगाबाद येथील रा. स्व. संघाच्या बैठकीस उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे जालना जिल्हा भाजप कार्यालयातून यापूर्वी सांगण्यात आल्याप्रमाणे २७ जानेवारी रोजी भाजप प्रदेश पदाधिकाऱ्यांची बैठक सायंकाळी जालना येथे होणार नाही. आता ही बैठक २८ जानेवारी रोजी सकाळी होईल आणि त्यानंतर पक्षाच्या विस्तारित राज्य कार्यकारिणीची बैठक होईल.

जालना शहरातील मंठा चौफुली परिसरातील एका बियाणे उद्योगाच्या परिसरात जालना येथील बैठक होणार आहे. राज्यभरातील साडेआठशे प्रतिनिधी विस्तारित राज्य कार्यकारिणीच्या बैठकीस उपस्थित राहतील. तत्पूर्वी सकाळी होणाऱ्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीस जवळपास ४० जणांची उपस्थिती अपेक्षित आहे. येत्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होणारी ही बैठक महत्त्वपूर्ण मानली जात आहे.