02 March 2021

News Flash

राज्यात थंडीचे ठाण, मुक्काम वाढणार !

विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्राला तडाखा

सर्वदूर गारठा; विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्राला तडाखा

उत्तरेकडील काही भागात सध्या सुरू असलेल्या बर्फवृष्टीमुळे तिकडून महाराष्ट्रात येणाऱ्या अतिथंड वाऱ्यांची तीव्रता वाढली आहे. परिणामी राज्यात सर्वदूर गारठा निर्माण झाला आहे. प्रामुख्याने विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राला थंडीचा तडाखा बसतो आहे. बहुतांश भागांतील किमान तापमान ६ ते १० अंश सेल्सिअसच्या खाली गेले आहे. पुढील दोन ते तीन दिवस थंडीचा प्रभाव कायम राहणार असून, विदर्भ आणि मराठवाडय़ातील काही भागात थंडीची लाट तीव्र होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. त्यामुळे नवीन वर्षांच्या स्वागतालाही राज्यात थंडी राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

३१ डिसेंबर ते ३ जानेवारीपर्यंत विदर्भात थंडीची तीव्र लाट, तर मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रामध्ये तुरळक ठिकाणी थंडीची लाट येण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. नागपूरमध्ये रविवारी राज्यातील नीचांकी ४.० अंश तापमानाची नोंद झाली. पुण्यासह विविध शहरांमध्ये पारा मागील दहा ते बारा वर्षांच्या तुलनेत प्रथमच नीचांकी पातळीपर्यंत घसरला. दरम्यान, राज्यातील कोरडय़ा हवामानामुळे थंडीला पोषक स्थिती निर्माण झाली असतानाच उत्तरेकडून येणाऱ्या थंड प्रवाहांमुळे मागील चार दिवसांपासून राज्यभरात थंडीचा कडाका वाढला आहे. रोजच किमान तापमानात घट नोंदविली जात आहे. कोकण, मुंबई विभागातील तापमान सरासरीच्या आसपास आहे. सांताक्रुझचा पारा मात्र खाली उतरला असून, रविवारी येथे १५.६ अंश तापमानाची नोंद झाली. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात मात्र थंडीच्या लाटेची स्थिती आहे. मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत ३ ते ५ अंशांनी घट झाली आहे. पुण्यात शनिवारी नीचांकी ५.९ अंश तापमानाची नोंद झाली होती. रविवारी त्यात केवळ ०.१ अंशाने वाढ झाली. त्यामुळे कडाक्याची थंडी कायम आहे. नगरमध्येही तीव्र गारठा असून, तेथे ४.५ अंश तापमानाची नोंद झाली. नाशिक, मालेगावमध्ये ७.० अंश तापमान नोंदविले गेले.

मराठवाडय़ात सर्वच ठिकाणी तापमान १० अंशाखाली आहे. औरंगाबाद आणि परभणीमध्ये किमान तापमान अनुक्रमे ६.८ आणि ६.६ अंशांपर्यंत खाली आले आहे. विदर्भामध्ये इतर ठिकाणच्या तुलनेत गारठा अधिक आहे.

बहुतांश भागात तापमानात घट होत आहे. नागपूरमध्ये शनिवारी ४.० अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले. सरासरीच्या तुलनेत हे तापमान तब्बल ८ अंशांनी कमी आहे. गोंदियात ५.२, तर अकोल्यात ६ अंशाच्या आसपास तापमान असून, इतर ठिकाणी ६ ते ९ अंशांच्या आसपास किमान तापमानाची नोंद झाली आहे.

किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)

मुंबई (कुलाबा) २०.०, सांताक्रुझ १५.६, रत्नागिरी १७.५, पुणे ६.०, नगर ४.५, जळगाव ६.६, कोल्हापूर १३.६, महाबळेश्वर १०.२, मालेगाव ७.०, नाशिक ७.०, सांगली १०.४, सातारा ९.४, सोलापूर १०.४, उस्मानाबाद ८.९, औरंगाबाद ६.८, परभणी ६.६, नांदेड ७.०, अकोला ५.९, बुलडाणा ७.५, ब्रह्मपुरी ६.३, गोंदिया ५.२, अमरावती ८.४, चंद्रपूर ८.२, यवतमाळ ९.४, वाशीम ८.८, वर्धा ७.५.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 31, 2018 12:35 am

Web Title: temperature in maharashtra 19
Next Stories
1 ‘त्यांनी माझं घर जाळलं, पण मी कोरेगाव-भीमाला जाणारच’
2 देशात अघोषित आणीबाणीचे वातावरण, जयंत पाटील यांचा आरोप
3 पिंपरी-चिंचवड : सराईत गुन्हेगाराचा घरात घुसून कोयत्याने ४० ते ४५ वार करून खून
Just Now!
X