फटाक्यांच्या कारखान्याला लागलेल्या आगीत दहा जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची दुर्घटना गुरुवारी येथून नजीक असलेल्या भायमळा गावी घडली. आगीत २० जण गंभीररीत्या भाजले असून त्यातील नऊ जणांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना उपचारासाठी मुंबईला हलवण्यात आले आहे.
भायमळा येथे सुभाष बोबडे क्रांती फायर वर्क्‍स हा फटाक्यांचा कारखाना आहे. त्याला गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास आग लागली. आगीमुळे कारखान्यात स्फोटांची मालिका सुरू झाली. त्यांची तीव्रता एवढी होती की, दहा किलोमीटर अंतरापर्यंत त्यांचे आवाज ऐकू येत होते. आग लागली त्या वेळी कारखान्यात सुमारे ३५ ते ४० कामगार होते. त्यातील दहा जणांचा होरपळून मृत्यू झाला. मृतदेहांचा अक्षरश: कोळसा झाला असून मृतांची ओळख पटण्यात अडचणी येत आहेत. २० जखमींपैकी नऊ जणांची प्रकृती चिंताजनक आहे.
चार तासांनंतर आग आटोक्यात
आगीचे वृत्त समजताच अलिबाग नगरपालिका, आरसीएफ कंपनी, जेएसडब्ल्यू कंपनी, पाताळगंगा एमआयडीसी व रिलायन्स केमिकल्स आदींच्या अग्निशामक दलांना पाचारण करण्यात आले. चार तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणण्यात या दलांना यश आले.
क्रांती फायर वर्क्‍स कारखान्याच्या शेजारी असलेल्या राजानी फायर वर्क्‍स या अन्य एका कारखान्याच्या गोदामालाही आगीची झळ पोहोचली. मात्र, स्थानिकांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला.