‘निसर्गाचं संतुलन बिघडलं आहे तसं राजकारणचंही संतुलन बिघडलं आहे’, अशा शब्दात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्याच्या सध्याच्या राजकीय परिस्थितीबाबत भाष्य केलंय. “यापुढे नागरिक हे अधिक विचारपूर्वक मतदान करतील. जातीचं, पैशांचं राजकारण संपेल” असं ते पुढे म्हणाले. तसेच, “महाविकास आघाडीच्या सरकारला खाली खेचण्याचा कुठलाही प्रयत्न भारतीय जनता पक्षाचा नाही. या सरकारला पाडण्यासाठी बाहेरून कोणीही काहीही करावे लागणार नाही”, असा टोला पाटील यांनी लगावला. पिंपरी-चिंचवडमध्ये पदाधिकाऱ्यांच्या बैठकीपूर्वी पत्रकारांशी ते बोलत होते.

“विरोधासाठी विरोध करणारी माणसं आम्ही नाहीत. खातेवाटप झाले त्याबाबत आनंद आहे. उत्तम काम करावं, नागरिकांच्या अडचणी समजून काम करावं”, असा सल्ला पाटील यांनी महाविकास आघाडीला दिला आहे. भाजपाच्या ऑपरेशन लोटसबाबत बोलताना पाटील म्हणाले, “महाविकास आघाडीच्या सरकारला खाली खेचण्याचा कुठलाही प्रयत्न भारतीय जनता पक्षाचा नाही. आमचा पक्ष प्रबळ विरोधी पक्ष म्हणून काम करेल. या सरकारला पाडण्यासाठी बाहेरून कोणीही काहीही करावं लागणार नाही. असा टोलाही पाटील यांनी महाविकास आघाडीला मारला.

त्यानंतर बोलताना, “काही राज्यात उलट-सुलट राजकारण चालत आहे. महाराष्ट्रात खूप प्रामाणिकपणाचं राजकारण व्हायचं. पण यावेळी काय झालं हे माहीत नाही. अवेळी पाऊस झाला…गारा पडल्या, त्या जशा अनाकलनीय आहे. तसं हेही नागरिकांना अनाकलनीय आहे. नव्याने जेव्हा निवडणूक लढाल तेव्हा लोकांना माहीत आहे कोणाला मतदान करायचं आणि कोणाला नाही. त्यामुळे यातून नागरिक निराश न होता अधिक सतर्क झाले पाहिजे. भाबडेपणाने मतदान करून चालत नाही. त्यामुळे हे खरंच आहे, जसं निसर्गाचं संतुलन बिघडलं आहे तसं राजकारणचं देखील संतुलन बिघडलं आहे. नागरिक हे अधिक विचारपूर्वक मतदान करतील. जातीचं, पैशांचं राजकारण संपेल”, असे पाटील यावेळी म्हणाले.

पाहा व्हिडिओ –