नीरज राऊत

करोना संसर्गाच्या समाज माध्यमांवर येणारा बातम्या, देशातील एकंदर परिस्थितीचा परिणाम तसेच आपल्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी निर्माण झालेल्या ओढीमुळे गुजरात राज्यातील वेरावळ येथून कुटुंबीयांना भेटण्यासाठी निघालेल्या राज्यातील सुमारे आठशे खलाशांना अखेर पुन्हा वेरावळच्या दिशेने परतावे लागले. गुजरातच्या शासनाने महाराष्ट्रातील खलाशांना महाराष्ट्राच्या हद्दीलगतच्या नारगोळ बंदरामध्ये उतरवून घेण्यास नकार देऊन केलेल्या दुजाभाव भावामुळे त्यांच्यावर ही नामुष्की ओढावली.

गुजरातमधील ओखा, पोरबंदर, वेरावळ या पट्ट्यात मासेमारी व्यवसाय करणारे सुमारे ३० ते ३५ हजार कामगार असून त्यांपैकी बहुतेक कामगार हे दक्षिण गुजरात, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, ओडीसा, आंध्रप्रदेश व अन्य राज्यातून त्या भागात कामाला आहेत. ही मंडळी वर्षात एक दोन वेळा आपल्या कुटुंबियांना भेटायला आपल्या मूळ गावी जात असतात. मात्र, सध्या देशभरात पसरलेल्या करोना संसर्गाच्या परिस्थितीमुळे भयभीत झालेल्या दक्षिण गुजरात व महाराष्ट्रातील काही मंडळींना मूळ गावी जावे असे प्रकर्षाने वाटल्याने ही मंडळी २३ बोटींमधून प्रवास करत ४ एप्रिल रोजी गुजरात किनाऱ्यावर पोहचले. प्रथमतः तेथील मच्छीमार समुदायाने या खलाशांना गुजरात किनाऱ्यावर उतरण्यास मज्जाव केला होता.

त्यानंतर गुजरात सरकारने समन्वय साधून या बोटीमध्ये असलेल्या १,१२३ खलाशांना ५ एप्रिल रोजी (रविवारी) दुपारी नारगोळ बंदरामध्ये उतरवून घेतले. त्या खलाशांची बंदरावरच प्राथमिक तपासणी करून त्यांचे अलगीकरण करण्याच्या सूचना देण्यात आल्या असे सांगण्यात येते. असे करताना महाराष्ट्रातील ८०० खलाशांना गुजरातमध्ये उतरवण्यास प्रशासनाने मज्जाव केल्याचे खलाशांनी राज्यातील मच्छीमार प्रतिनिधींना सांगिलते. यामुळे नाईलालजाने ही खलाशी मंडळी नारगोळच्या किनाऱ्यालगतच्या नांगरलेल्या बोटीमध्ये होती व आज सकाळी याबाबत पुढील निर्णय घेतला जाईल अशी आशा होती.

दरम्यान, काल रात्री काही स्थानिक मंडळींनी नांगरून ठेवलेल्या बोटींमधील खलाशांना घाबरवण्याचा प्रयत्न केल्याने त्यांच्यामध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली. तसेच राज्य बंदी असल्याने महाराष्ट्रात प्रवेश करण्याची शक्यता धूसर वाटल्याने त्यांनी आपल्या परतीचा प्रवास मध्यरात्री सुरू केला. ही मंडळी १६-१७ तासांचा प्रवास करून सोमवारी सायंकाळी वेरावळ बंदराच्या ठिकाणी पोहोचतील अशी शक्यता मंगरूळ येथील मच्छिमार नेते विरजी मसाणी यांनी लोकसत्ता’ला सांगितले. गुजरातच्या कच्छ भागात ३० ते ३५ हजार परराज्यातील खलाशी कार्यरत असून तेथील मच्छीमार खलाशांची योग्य पद्धतीने देखभाल करत असलयाचे ते म्हणाले. खलाशांची दर दोन-तीन दिवसांनी वैद्यकीय तपासणी केली जात असून त्यांच्या खाण्यासाठी सामुग्री पुरविली जात असल्याचेही त्यांनी सांगितले. लॉकडाउनच्या काळात खलाशांनी आपल्या गावी जाऊ नये असा सल्लाही गुजरातमधील मच्छिमार नेत्यांनी दिला होता. मात्र, घराची ओढ असल्याने काही तरुण मंडळींना अनावर झाल्याने त्यांनी आपल्या घरी जाण्याचा आग्रह धरला होता. असे असताना गुजरात राज्याने दाखवलेल्या असंवेदनशीतेमुळे राज्यातील सुमारे आठशे खलाशांना नाईलाजाने परतावे लागले आहे.

यासंदर्भात पालघरचे जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता राज्यातील काही खलाशी गुजरातच्या किनार्‍यावर पोहोचल्याची आपल्याला माहिती मिळाल्यानंतर वलसाड जिल्हाधिकाऱ्यांशी आपण संवाद साधण्याचे सांगितले. आपल्याकडे या खलाशांनी किंवा त्यांच्या प्रतिनिधी राज्याच्या किनाऱ्यावर उतरण्यासाठी किंवा पालघर जिल्ह्यात प्रवेश देण्याबाबत कोणतीही विनंती केली नसल्याचा त्यांनी खुलासा केला. या खलाशांची आवश्यक देखभाल करण्यासाठी गुजरात प्रशासनाला सूचित करण्यात आले आहे.