चंद्रपूर जिल्ह्यामध्ये वाघाची दहशत निर्माण झाली असून बुधवारी एकाच दिवशी तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये तीन जणांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. याशिवाय, वाघाच्या बंदोबस्तासाठी जंगलात गेलेला एक वनरक्षक देखील वाघाच्या हल्ल्यात जखमी झाला आहे. यातली पहिली घटना सिंदेवाही तालुक्यातली आहे. सिंदेवाही तालुक्यातील नवरगाव जवळील पेंढरी येथील दिवाण तलाव परिसरात बुधवार १९ मे ला सकाळच्या सुमारास कोकेवाडा, पेंढरी येथे राहणाऱ्या ५५ वर्षीय महिलेला वाघाने ठार केले. मृतक महिला ही तेंदूपत्ता संकलनाकरीता गेली होती. मात्र त्या ठिकाणी दबा धरून बसलेल्या वाघाने सीताबाई गुलाब चौके या महिलेवर अचानक हल्ला केला. या हल्ल्यात महिला जागीच ठार झाली. घटनेची माहिती मिळताच सिंदेवाही व नवरगाव येथील पोलीस व वनविभागाचा चमू घटनास्थळी दाखल झाला.

जंगलात न जाण्याचं वनविभागाचं आवाहन

दुसऱ्या घटनेत तेंदूची पाने गोळा करण्यासाठी गेलेल्या ३५ वर्षीय रजनी भालेराव या महिलेचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला. चिपराला बिट ऑर्डनन्स फॅक्टरी भागात आज सकाळी रजनी भालेराव तेंदूची पाने गोळा करण्यासाठी गेल्या होत्या. मात्र दबा धरून बसलेल्या वाघाने रजनी यांच्यावर हल्ला चढवला. अचानक झालेल्या या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला. सध्या तेंदूचा हंगाम असल्याने नागरिक जंगलात तेंदूची पाने गोळा करतात मात्र उन्हाळ्याचे दिवस असल्याने वन्यप्राणी पाण्याच्या शोधात गावात येत असतात. यावेळी नागरिकांनी जंगलात जाणे टाळावे असे आवाहन वनविभागाच्या वतीने करण्यात येत आहे.

पिंजऱ्याचा दरवाजा उघडा राहिला आणि वाघिणीने हल्ला केला; प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्याचा मृत्यू

तिसऱ्या घटनेत सावली तालुक्यातील निफांद्रा येथे वाघाच्या हल्ल्यात रामा आडकू मारबते या ७० वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाला. तर गेवराच्या जंगलात वाघाचा मागोवा घेत असताना अचानक वाघाने हल्ला केला असता वनरक्षक संदीप चौधरी जखमी झाले आहेत.