नांदेडच्या मुखेड तालुक्यात एका महिलेच्या अंत्यविधीसाठी गेलेल्या तिघेजण आंघोळ करण्यासाठी तलावात उतरले. या तलावात या तिघांचाही बुडून मृत्यू झाला. शुक्रवारी संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. गावकऱ्यांनी तिघांचेही मृतदेह बाहेर काढले आहेत. मुखेड तालुक्यातील जाब येथील अनुसया देवज्ञ या महिलेचा वृद्धापकाळाने मृत्यू झाला.

त्यांच्या अंत्यविधीसाठी मोठ्या प्रमाणावर नातलग आले होते, अंत्यविधी दुपारी दोन वाजता पार पडला. यानंतर अनेक पाहुणे आपापल्या गावी गेले. मात्र लक्ष्मण दिगंबर कोटकर (वय ३०) रा.होट्टल ता.देगलूर, विशाल निवृत्ती सावळकर (वय २५) राहणार आरळी ता.बिलोली, दत्ता विठ्ठल देवज्ञ (वय १८) राहणार जांब (बु.), मारुती देवज्ञ राहणार जांब (बु.) हे चौघे अंत्यविधी आटोपून गावालगत असलेल्या तलावात अंघोळीसाठी गेले असता मारुती देवज्ञ हे वर थांबले.

बाकी तिघे जण पाण्यात उतरले, बराच वेळ झाल्यानंतर ते वर न आल्याने मारुती देवज्ञ यांनी मदतीसाठी आरडाओरड केली. मात्र आजुबाजुला कोणी नसल्याने त्यांनी गावात जाऊन नागरिकांना ही बाब सांगितली. यानंतर गावातील नागरिकांनी तलावात बुडालेल्या तिघांचे मृतदेह बाहेर काढले. मृतदेह बाहेर काढण्यात पं.स.सदस्य मनोज गोंड, मनोहर मोरे, दत्ता पुंडे, संग्राम मोरे, बाळू मुजावर, अण्णाराव शिंदे, सोमनाथ फुलारी, मारुती कोरे, श्याम शिंदे, भानुदास गोंड ,सूर्यकांत मोरे आदींनी प्रयत्न केल्याचे सांगण्यात आले.