कारने ट्रॅक्टरला मागून धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तिघे जण ठार झाले. वृद्ध आई, वडील, मुलगा यांचा मृतांत समावेश आहे. यात दहा वर्षीय मुलगा वरद सुरेंद्र दोंदळकर हा गंभीर जखमी झाला. ही घटना अमरावती-मोर्शी मार्गावर माहुली जहागीर नजीक शनिवारी दुपारी घडली.

सोमेश प्रभाकर काळबेंडे (२६), प्रभाकर रामचंद्र काळबेंडे (६५), राजमती प्रभाकर काळबेंडे (६२) रा. सर्व वरुड अशी मृतांची नावे आहेत. वरदवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वडिलांना उपचारासाठी रुग्णालयात घेऊन जायचे असल्याने सोमेश काळबेंडे सकाळी ११ वाजता वरुड येथून  कारने अमरावतीकडे निघाले. दुपारी एक वाजताच्या सुमारास माहुली जहागीर ओलांडल्यानंतर एका पुलाजवळ ही भरधाव कार अमरावतीकडे जात असताना समोर उभ्या असलेल्या ट्रॅक्टरवर आदळली. धडक एवढी जबर होती की कारचा पुढचा भाग चक्काचूर झाला. वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात सोमेश यांचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कार ट्रॅक्टर ट्रॉलीवर जाऊन धडकल्याचे सांगण्यात येते. यामध्ये प्रभाकर काळबेंडे, राजमती काळबेंडे आणि सोमेश काळबेंडे या तिघांचा जागीच मृत्यू झाला. वरद हा प्रभाकर काळबेंडे यांचा नातू आहे.

माहुली जहागीरच्या ठाण्यातील पोलिसांनी जखमीला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. नंतर त्वरित खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. नातेवाईकांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात गर्दी केली. प्रभाकर काळबेंडे, राजमती काळबेंडे हे दोघेही वरूडच्या न्यू इंग्लिश हायस्कूलमध्ये शिक्षक होते. नुकतेच दोघेही निवृत्त झाले होते. कृषी पदविधर सोमेश व्यवसाय करीत होता.