प्रशांत देशमुख
प्रायोगिक तत्वावर निर्माण होत असलेल्या करोना लशीचा स्वतःवर प्रयोग करून घेण्यास धास्ती असण्याच्या पार्श्वभूमीवर शिक्षकांनीच पुढाकार घेतल्याचा अनुभव वैद्यकीय संस्थेला चकित करणारा ठरला. कोविड 19 चा आजार होऊ नये म्हणून जगभरात संशोधन सुरू असून भारतात सुद्धा सिरीम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची कोविशिल्ड व इंग्लंडच्या ऑक्सफर्ड विद्यापीठ निर्मित ( CD-DOX1 NCOV-19) लस प्रायोगिक तत्वावर देणे सुरू आहे, भारतात तिसऱ्या टप्प्यात मध्ये एकूण एक हजार सहाशे व्यक्तींवर लसीचा काय प्रभाव होत आहे,याचा अभ्यास सुरू आहे.
भारतात १८ केंद्रावर प्रायोगिक चाचणी घेतली जात आहे. त्यापैकी एक असलेल्या सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयात संशोधन सुरू आहे, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदतर्फे या अभ्यासाची देखरेख केल्या जात आहे. लसीकरण चाचणी प्रायोगिक तत्वावर सुरू झाल्याचे कळल्यावर राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे पदाधिकारी विजय कोंबे, चंद्रशेखर ठाकरे व प्रशांत निंभोरकर यांनी प्रयोगशाळा संचालक यांना विनंती करीत चाचणीची तयारी दर्शविली, ती मान्य झाली. लसीकरण करण्यात आल्यानंतर या तिन्ही शिक्षकांनी इतर शिक्षक बंधूंना स्वेच्छेने लसीकरण करण्याचे आवाहन आज सायंकाळी केले. त्यासाठी मार्गदर्शन करण्याचे त्यांनी सूचित केले
विजय कोंबे या संदर्भात लोकसत्ताशी बोलतांना म्हणाले की मानवी जीवनात करोना ने भयप्रद स्थिती निर्माण केली आहे, करोना संक्रमणापासून बचाव करण्याच्या या संशोधनपर प्रयोगात स्वेच्छेने सहभागी होण्याचे आवाहन आम्ही करीत आहोत. शिक्षकांकडून समाजातील प्रत्येकाला काही अपेक्षा असतेच. पण या वेळी अशी भावना नसतान्ही आम्हीच पुढे आलोत हे कर्तव्यच आहे असं मानतो.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on October 7, 2020 10:00 pm