मातंग समाजाची तीन मुले विहिरीत पोहली म्हणून त्यांना अमानुष मारहाण करण्यात आली. महाराष्ट्राच्या पुरोगामी परंपरेला काळीमा फासणारी ही घटना जळगाव येथील जामनेर तालुक्यातील वाकडी गावात घडली आहे. भटका जोशी समाजाकडून या तिघांना मारहाण करण्यात आली आहे. पीडितांकडून या संदर्भात पोलिसात तक्रार नोंदवण्यात आली आहे. मातंग समाजाच्या तीन मुलांना बेदम मारहाण करण्यात आली आहे. मात्र ही तक्रार मागे घेण्यासाठी आरोपींकडून दबाव टाकण्यात येतो आहे. विहिरीत पोहल्यामुळे या तिघांची गावातून धिंड काढण्यात आली.

मातंग समाजाचे हे तीन तरूण विहिरीत पोहायला उतरले यात त्यांची काय चूक होती? मात्र इतक्या क्षुल्लक कारणावरून त्यांना अत्यंत अमानुषपणे मारहाण करण्यात आली. त्यांची गावातून धिंड काढण्यात आली. माणसाने जातीभेदाच्या भिंती पाडून टाकायला हव्या आणि त्यापलिकडे जाऊन एकमेकांशी माणूस म्हणून वागावे अशी शिकवण कायमच समाजला दिली जाते. मात्र या सगळ्यावर बोळा फिरवणारी ही बातमी आहे असेच म्हणता येईल.

ही घटना १० जून रोजी घडल्याची माहिती समोर आली असून या मारहाणीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. आम्हाला गावात राहायचे आहे ही भीती बाळगून पीडितांच्या कुटुंबीयांनीही या प्रकरणी तक्रार देण्यास सुरुवातीला टाळाटाळ केल्याची माहिती समोर आली आहे. या तिघांनाही धिंड काढल्यानंतर एका शेतातल्या खोलीत नेण्यात आले आणि तिथे नग्नावस्थेत त्यांना मराहण करण्यात आली.

एकीकडे विकास, प्रगती, पारदर्शकता यांची स्वप्ने दाखवून महाराष्ट्रात राजकीय नेते मत मागताना दिसतात. या भागाचा असा विकास होणार, तसा विकास केला जाणार अशी आश्वासने दिली जातात. अशात महाराष्ट्र अजून जाती-भेदाच्या जोखडातून अजून मुक्तच झालेला नाही असे या घटनांमुळे समोर येताना दिसते आहे. या घटनेमुळे महाराष्ट्रात चाललंय काय? असा प्रश्न पडतोच आहे.

पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन मुले पिण्याच्या पाण्याच्या विहिरीत वारंवार पोहायला जात होते त्यांना वारंवार सांगून देखील हा प्रकार सुरू होता, यामुळे त्यांना मारहाण केली. पोहताना त्यांच्या अंगावर कपडे नव्हते त्यांना तशाच अवस्थेत मारहाण करण्यात आली. तसेच त्यांचे नग्न फोटो व्हायरल करण्यात आल्याने एका मुलाच्या आईच्या तक्रारी वरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  विशेष म्हणजे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या मतदार संघात हा प्रकार घडल्याने विरोधकांनी पुन्हा एकदा भाजपाला टीकेचे लक्ष केले आहे.