करोनाने मृत्यू झाल्याच्या अफवेमुळे नातेवाईक पुढे न आल्याने जत नगरपालिका प्रशासनालाच एका तरुणाच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ रविवारी रात्री आली. मुंबईहून आलेल्या ३८ वर्षांच्या तरुणाचे खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना रक्तक्षयामुळे दुपारीच निधन झाले होते.

रविवारी दुपारी या तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर जत शहर आणि तालुक्यात करोनाने मृत्यू झाल्याची अफवा वाऱ्यासारखी पसरली. याबाबत आरोग्य विभागाने तातडीने दखल घेत या तरुणाच्या मृत्यूचे कारण तपासले असता या तरुणाच्या शरीरामध्ये रक्त कमी असल्याने मृत्यू झाल्याचे समोर आले.

दुपारी या तरुणाचा मृत्यू झाला असला तरी मृतदेह ताब्यात घेऊन अंत्यविधी करण्यासाठी नातेवाईकच पुढे येण्यास धजावत नव्हते. या तरुणाच्या स्वॅबची करोना चाचणी करण्याची मागणी काही करीत होते. मात्र मृत्यूनंतर अशी चाचणी करता येणार नाही अशी भूमिका आरोग्य विभागाने घेतली. अखेर मृताच्या आईवडिलांनी पार्थिवावर नगरपालिकेने अंत्यसंस्कार करण्यास सहमती दर्शवली. त्यानंतर रविवारी रात्री दहा वाजल्यानंतर या पार्थिवावर नगरपालिका प्रशासनाने अंत्यविधी केला. दरम्यान, या तरुणाचा मृत्यू करोनामुळे झालेला नसल्याचा खुलासा पोलिसांनी शहराच्या चौका-चौकात केला. तरीही समाज माध्यमातील अफवेमुळे अंत्यविधीसाठी नातलगही उपस्थित राहिले नाहीत. नगरपालिकेचे मुख्याधिकारी अभिजित हराळे आणि आरोग्य विभागाचे कर्मचारी आणि काही सामाजिक कार्यकत्रे यांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार उरकण्यात आले. मृत तरुणाच्या आईवडिलांच्या स्वॅबची करोना चाचणी घेण्याची तयारी आरोग्य विभागाने दर्शवली असून त्यांना देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे.