गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शक्य आहे, ते सर्व काही करण्यास राज्य सरकार कटीबद्ध असून यासंदर्भातील निर्णय सोमवारी नागपूर अधिवेशनात जाहीर करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. सरकार नुकसानग्रस्तांच्या पाठीशी असून मदतीसाठी प्रसंगी कर्ज काढू, असा विश्वास त्यांनी दिला. मुख्यमंत्र्यांनी रविवारी जिल्ह्यातील गारपिटीसह अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतीची पाहणी केली. यावेळी ठिकठिकाणच्या बैठकांमध्ये मुख्यमंत्र्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला.
गेल्या आठवडय़ात सलग तीन दिवस जिल्ह्यातील मालेगाव, बागलाण, देवळा, दिंडोरी, निफाड, येवला या तालुक्यांमध्ये गारपीट आणि पावसाने द्राक्षे, कांदा, डाळिंब, गहू, टोमॅटो या पिकांचे अतोनात नुकसान केले. प्राथमिक अंदाजानुसार नुकसानीचे पीक क्षेत्र ३० हजार हेक्टरपेक्षा जास्त आहे. दिंडोरी आणि निफाड या तालुक्यांमधील निम्म्याहून अधिक द्राक्षशेती उद्ध्वस्त झाली आहे. या आपत्तीत सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचा विश्वास देण्यासाठी आणि नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी दुपारी दिंडोरी आणि चांदवड तालुक्यांचा दौरा केला. दिंडोरी तालुक्यात शेतकऱ्यांशी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी या आपत्तीतून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी त्यांचे कर्ज, व्याज तसेच पुन्हा कर्ज मिळावे म्हणून पत निर्माण करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात येईल, अशी ग्वाही दिली.
फळबागांसाठी आच्छादनाची योजना
संरक्षित फलोत्पादनातंर्गत फळबागा आच्छादित करण्यासंदर्भात आणि त्यासाठी लागणाऱ्या प्लास्टिकच्या आयातीसंदर्भात योजना तयार करण्यात येईल. याशिवाय ग्रामस्तरावर दोन हजार नवीन हवामान केंद्रे तयार करण्यासंदर्भात निर्णय घेतला जाईल, असे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिले. मुख्यमंत्र्यांसमवेत सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, सहकार राज्यमंत्री दादा भुसे यांच्यासह स्थानिक आमदार, जिल्हाधिकारी विलास पाटील आदी उपस्थित होते.

*नाशिक जिल्ह्य़ातील दिंडोरी तालुक्यात नुकसानग्रस्त द्राक्षबागेची पाहणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. (छाया- संदीप तिवारी)