आदिवासी विकास प्रकल्प खात्यातील भ्रष्टाचार पुन्हा चव्हाटय़ावर आला आहे. मुंबई- गोरेगाव येथील आदिवासी विकास प्रकल्प खात्यातील वरिष्ठ लिपिक युवराज करणकाळे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या ठाणे येथील पोलीस उपअधीक्षक सावंत यांच्या पथकाने ५० हजारांची लाच घेताना पेण येथे रंगेहाथ पकडले.
याबाबत सविस्तर माहिती अशी की आदिवासी कार्यालयाच्या अंतर्गत असलेल्या कर्जत आश्रमशाळेतील स्वयंपाकी संतोष कैलास जाधव यांची बदली अलिबाग तालुक्यातील कोलघर आश्रयशाळेत करण्यात आली होती.
ही बदली रद्द करण्याकरिता ५० हजारांची लाच मागण्यात आली होती. या प्रकरणी संतोष जाधव यांनी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. त्यानुसार लाचलुचपत पथकाने बुधवारी सापळा रचला होता. बुधवारी सायंकाळी आदिवासी प्रकल्प कार्यालयानजीक असलेल्या एका रसवंतीगृहात युवराज करणकाळे याला ५० हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक केली. या प्रकरणी पेण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.